जत तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:49+5:302021-04-20T04:28:49+5:30
जत : जत तालुक्यात सोमवारी विविध ठिकाणी झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला. जत शहरातील मंगळवार पेठेतील व्यापारी ...
जत : जत तालुक्यात सोमवारी विविध ठिकाणी झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला.
जत शहरातील मंगळवार पेठेतील व्यापारी कुमार छत्रपती जमदाडे यांचा मुलगा अमोल कुमार जमदाडे (वय २२) याने घरी दुपारी बाराच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्यांचा भाऊ आदित्य यांनी बघितल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली. जमदाडे यांच्या घरातील सर्वजण घरगुती कार्यक्रमासाठी पलूस येथे गेले होते. घरात कोणीच नसल्याचे पाहून त्याने घरातील पंख्याला दोरीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.
तिप्पेहळ्ळी (ता. जत) येथील अमित उर्फ शंकर अरुण शिंदे (३०) यांनी घरासमोरील मळ्यातील झाडाला दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी तीनच्या दरम्यान घडली. शंकर शिंदे आई, वडील, पत्नी व दोन मुले यांच्यासमवेत शेतातील घरात एकत्रितपणे राहत होते.
उमराणी (ता. जत) येथील गावतलावात यमनाबाई सिद्राम कांबळे (७०) कपडे धुण्यासाठी गेल्या असताना पाण्यात पाय घसरून पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी ११च्या दरम्यान घडली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी याची माहिती त्यांच्या नातेवाइकांना दिली. याप्रकरणी सचिन नागाप्पा कांबळे यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.