जुनोनीजवळ तिहेरी अपघातात कुकटोळीच्या दोघांसह तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:41 AM2019-11-21T00:41:07+5:302019-11-21T00:41:12+5:30
सांगोला/सांगली : भरधाव पिकअपने दुचाकीसह दुसऱ्या पिकअपला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघांसह क्लिनर, असे ...
सांगोला/सांगली : भरधाव पिकअपने दुचाकीसह दुसऱ्या पिकअपला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघांसह क्लिनर, असे तिघेजण जागीच ठार झाले. पिकअपचा एक चालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसरा चालक किरकोळ जखमी आहे. हा भीषण अपघात बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सांगोला- मिरज रोडवरील जुनोनी गावाजवळ घडला.
अजित रंगराव तुरुके (वय ४०) व सागर रघुनाथ पडुळकर (३२, रा. दोघेही कुकटोळी ता. कवठेमहंकाळ, जि. सांगली) तर क्लिनर अक्षय आनंद जाधव (२३, रा. तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अपघातातील ठार झालेल्या मृतांची नावे आहेत. सुदाम बंडू पन्हाळकर (रा. नालवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे गंभीर जखमी चालकाचे नाव आहे. जोतिबा आण्णासाहेब मोरे (रा. रांगोळे, ता. हातकणंगले) असे किरकोळ जखमी चालकाचे नाव आहे. अपघातानंतर दोन्ही पिकअप एकमेकांवर पलटी झाल्याने दुचाकीसह चक्काचूर होऊन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
कुकटोळी (ता. कवठेमहंकाळ) येथील अजित तुरुके व सागर पडुळकर हे दोघे (एम एच १० बीओ ६३७६) या दुचाकीवरून बुरंगेवाडी (जवळा) येथील मित्राच्या मेहुण्याचे लग्न उरकून जुनोनीमार्गे त्यांच्या गावाकडे परत निघाले होते, तर सांगोल्याकडून त्याच्याच पाठीमागे इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील आईस्क्रीम व पिझ्झा वाहतूक करणारा (एम एच ०९ ईएम- ८६६०) पिकअप मिरजेच्या दिशेने जात होता. मिरजेकडून भरधाव येणाºया एम एच २३ -५०१९) या पिकअपने जुनोनी गावाजवळ हॉटेल वरदानंदनसमोर समोरून येणाºया प्रथम दुचाकीला जोराची धडक देऊन पिकअपवर जोरात आदळल्याने हा भीषण अपघात घडला. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.