नोकरीच्या आमिषाने तीन लाखांचा गंडा
By Admin | Published: February 12, 2017 11:42 PM2017-02-12T23:42:02+5:302017-02-12T23:42:02+5:30
सांगलीतील घटना : बनावट नियुक्तीचे पत्र; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : जिल्हा परिषदेत शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विठ्ठल विलास शिंदे (रा. पानाडे गल्ली, खणभाग, सांगली) यांना तीन लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी नोकरी लागल्याचे बनावट नियुक्तीपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे.
राहुल शंकर भोसले, त्याची पत्नी पूजा व अक्षय साखळकर (तिघेही रा. पंचमुखी मारुती रस्ता, सांगली) व सुरेश फोंडे (मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यातील राहुल भोसले हा मुख्य संशयित आहे.
विठ्ठल शिंदे यांचे मेहुणे राजू गडकरी हे मिरजेतील सुभाषनगरमध्ये राहतात. संशयित साखळकर याने गडकरी यांची भेट घेऊन, ‘जिल्हा परिषदेत शिपायाच्या जागा निघणार आहेत, माझा खूप वशिला आहे. कोणाला नोकरी लावायचे आहे का?’, अशी विचारणा केली. त्यावर गडकरी यांनी, ‘माझ्या भाचाला नोकरी लावायची आहे’, असे सांगितले. त्यानंतर गडकरी यांनी त्यांचे भाऊजी विठ्ठल शिंदे यांच्या कानावर हा विषय घातला. शिंदे यांचा मुलगा ओंकार यास नोकरी लावण्याचे त्यांनी ठरविले. त्यानंतर नोकरी लावायची आहे, असे त्यांनी साखळकरला सांगितले. साखळकरने गडकरी व त्यांचा भाचा ओंकार यास आॅक्टोबर २०१५ मध्ये राहुल भोसले याच्या घरी नेले.
भोसलेच्या घरात नोकरीबाबत चर्चा झाली. यावेळी त्याची पत्नी पूजा, साखळकर व सुरेश फोंडे होते. या सर्वांनी गडकरी यांच्याकडे नोकरी लावण्यासाठी तीन लाखांची मागणी केली. त्याचवेळी गडकरी यांनी हा सौदा मान्य केला. दोन टप्प्यात प्रत्येकी ७५ हजार रुपयेप्रमाणे दीड लाख रुपये दिले. उर्वरित दीड लाख रुपये शिंदे यांनी १२ जानेवारी २०१७ पर्यंत सहा टप्प्यात दिले. तीन लाख मिळाल्यानंतर संशयितांनी नोकरी लावण्याबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे शिंदे यांनी पैसे परत मिळविण्यासाठी तगादा लावला. त्यावेळी संशयितांनी शिंदे यांना त्यांच्या मुलास नोकरी लावल्याचे बनावट नियुक्ती पत्र दिले. तसेच ओळखपत्रही दिले. पण आता लगेच जिल्हा परिषदेत जाऊ नका, जानेवारी २०१७ मध्ये तुमचे काम होईल, असे सांगितले. मात्र जानेवारी महिना उजाडल्यानंतर संशयित गायब झाले. त्यांचे मोबाईलही बंद होते. शिंदे यांनी जिल्हा परिषदेत चौकशी केली असता, शिपाई पदाच्या कोणत्याही जागा निघाल्या नसल्याचे समजले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. (प्रतिनिधी)
फसवणुकीची
व्याप्ती मोठी
संशयितांनी शिंदे यांच्या मुलासह अन्य सुशिक्षित बेरोजगार तरुणांनाही जिल्हा परिषदेत शिपाई पदावर नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा आहे. फसवणुकीची ही व्याप्ती फार मोठी आहे. संशयितांनी गेल्या वर्षभरात हा सारा उद्योग केला आहे, परंतु सध्या तरी केवळ शिंदे यांच्या माध्यमातून एकच तक्रार दाखल झाली आहे. सुरुवातीला विश्रामबाग पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याकडे शिंदे यांनी निवेदन दिले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची सूत्रे तातडीने हलली.