एक रुपयात पीकविमा, तरीही सांगली जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचे दुर्लक्षच

By अशोक डोंबाळे | Published: July 22, 2023 06:04 PM2023-07-22T18:04:37+5:302023-07-22T18:06:37+5:30

शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरूनही पीकविमा उतरवू शकतात

Three lakh 40 thousand 320 farmers of Sangli district neglect the crop insurance scheme | एक रुपयात पीकविमा, तरीही सांगली जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचे दुर्लक्षच

एक रुपयात पीकविमा, तरीही सांगली जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचे दुर्लक्षच

googlenewsNext

सांगली : खरीप हंगामासाठी शासनाने एक रुपयात पीकविमा योजना आणली आहे; पण जिल्ह्यातील चार लाख ५० हजार शेतकरी खातेदारापैकी एक लाख नऊ हजार ६८० खातेदारांनीच ६१ हजार ३३४.५० हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविला आहे. उर्वरित तीन लाख ४० हजार ३२० शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे दुर्लक्ष केले आहे.

जुलैचा तिसरा आठवडा उलटलेला असताना जिल्ह्यात अवघ्या २१.८३ टक्के पेरण्या झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी दोन लाख ५५ हजार ९८४हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. यापैकी शनिवारपर्यंत ५५ हजार ९९६ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली आहे. अजूनही जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी नुकसान होते. एकतरी जास्त पाऊस पडतो किंवा पाऊसच न पडल्याने शेतकऱ्यांचे पीक हातातून जाते. अशा परिस्थितीत त्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ ही योजना लागू केली.

यापूर्वी या योजनेसाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे शेतकरी या योजनेत सहभागी होत नव्हते. यावर्षी शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी घ्यायचा आहे. यंदा ३१ जुलै २०२३ पर्यंत मुदत असताना आजपर्यंत एक लाख नऊ हजार ६८० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. उर्वरित तीन लाख ४० हजार ३२० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नाही.

अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यापर्यंत जाण्याची गरज

नाममात्र म्हणजे एक रुपयात शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरून आपल्या पिकांचा विमा उतरवू शकतात; परंतु याविषयी त्यांना माहिती नाही किंवा कृषी विभाग त्यांच्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाही. शेतकरी या योजनेपासून दूर असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत जाण्याची गरज आहे.

३१ जुलै अंतिम मुदत

एक रुपयात पीकविमा उतरण्यासाठी शेतकऱ्यांना दि. ३१ जुलैपर्यंतची अंतिम मुदत शासनाने दिलेली आहे.

शेतकरी स्वत:च्या मोबाइलवरूनही पीकविमा उतरवू शकतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हायला हवे, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. एक रुपयात पीकविमा असल्याने शेतकऱ्यांची भविष्यातील चिंता मिटणार आहे. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Three lakh 40 thousand 320 farmers of Sangli district neglect the crop insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.