भिलवडी परिसरात तीन लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:18+5:302021-04-24T04:26:18+5:30
भिलवडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर भिलवडी पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या चार दिवसांत परिसरातील ...
भिलवडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर भिलवडी पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या चार दिवसांत परिसरातील गावांमधून तीन लाख रुपये दंड वसूल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने ‘ब्रेक द चेन’चे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अठरा दुकानदारांवर प्रशासनाच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. विनाकारण फिरणारे,मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
भिलवडी व परिसरातील गावातील अत्यावश्यक सेवा वगळता अकरा वाजल्यानंतर सर्व दुकाने बंद होत आहेत. विविध सहा पथकांची नेमणूक करून गावागावात सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून
कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाईची दहशत सर्वत्र पसरली आहे. सकाळी अकरानंतर भिलवडी परिसरात सर्वत्र शुकशुकाट पसरलेला असतो.