सांगलीत ‘कुरिअर’मधून तीन लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Published: October 18, 2016 09:50 PM2016-10-18T21:50:56+5:302016-10-18T21:50:56+5:30
येथील सराफ कट्ट्यावरील तिरुपती कुरिअर सर्व्हिसच्या बंद कार्यालयाचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी साठ हजाराचे सोन्याचे दागिने, दोन लाख साठ हजाराची रोकड
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 18 - येथील सराफ कट्ट्यावरील तिरुपती कुरिअर सर्व्हिसच्या बंद कार्यालयाचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी साठ हजाराचे सोन्याचे दागिने, दोन लाख साठ हजाराची रोकड असा तीन लाख २० हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी दुपारी तीन ते सायंकाळी पावणेपाच यादरम्यान चोरीची ही घटना घडली आहे. शहर पोलिसांनी चौकशी करून मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
तानवडे बुक सेलर्ससमोरील ‘सानिका भवन’मधील न्यू सराफ अपार्टमेंटमधील तळघरात तिरुपती कुरिअर सर्व्हिसचा गाळाआहे. नऊ कर्मचारी येथे नोकरीला आहेत. अविनाश भानुदास माने (वय २१, रा. फलटण, सध्या कोल्हापूर) याच्यासह सर्व कर्मचारी सोमवारी दुपारी तीन वाजता कार्यालयास कुलूप लावून पार्सल वितरणासाठी गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी बनावट चावीने कार्यालयाचे कुलूप काढून आत प्रवेश केला. आत कुरिअरची दोन पार्सल होती. यामध्ये साठ हजाराचे दागिने व दोन लाख ६० हजाराची रोकड होती. ही दोन्ही पार्सल घेऊन चोरट्यांनी शटर्स लावून पलायन केले. पावणेपाच वाजता अविनाश माने आला. त्यावेळी शटर्सचे कुलूप काढलेले दिसले. तो आत गेला असता, पार्सल विस्कटलेली नव्हती, पण दागिने व रोकड असलेली दोन पार्सल गायब असल्याचे दिसले. त्यानंतर सर्व कर्मचारी आल्यानंतर चौकशी केली, पण चोरीबद्दल कोणालाच माहिती नव्हती.
अविनाश मानेसह सर्व कर्मचारी रात्री नऊ वाजता शहर पोलिस ठाण्यात गेले व पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांना त्यांनी या घटनेची माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी ३२ लाखांचा ऐवज गेल्याची माहिती दिली, पण इतक्या मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेल्या ऐवजाबद्दल या कर्मचाºयांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. कुरिअरमध्ये पार्सलच्या आवक-जावकची माहिती घेतली. त्यांच्या कोल्हापूर कार्यालयातही चौकशी केली. त्यावेळी केवळ तीन लाख २० हजाराचा ऐवज गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी रात्री माने याची फिर्याद घेऊन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कर्मचा-यांची चौकशी
बनावट चावीने कुलूप काढून चोरी झाल्याने पोलिसांनी कुरिअरमधील नऊ कर्मचा-यांना रात्रीच ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात स्वतंत्रपणे बसवून चौकशी केली जात आहे. सर्व कर्मचारी, पार्सल वितरणासाठी गेलो होतो, अशी माहिती देत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागही तपास करीत आहे. अजून कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.