तिघांनी गाव सोडले, अनेकांनी घर अन् शेतजमिनी विकल्या; सांगलीतील ऐतवडे बुद्रुकमध्ये सावकारीचा पाश घट्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 04:55 PM2023-10-06T16:55:38+5:302023-10-06T16:59:49+5:30
मनाई असतानाही कोऱ्या स्टॅम्पवर सह्या
शंकर शिंदे
ऐतवडे बुद्रुक : नात्यांचे उपकार एकवेळ फिटतील, पण सावकाराचे कर्ज फिटत नाही, असे म्हटले जाते. तरीही अनेक कारणांनी बँकांकडून झिडकारल्या गेलेल्या लोकांना नाईलाजास्तव खासगी सावकाराचे कर्ज घ्यावे लागते. ऐतवडे बुद्रुकला असाच खासगी सावकारीचा पाश घट्ट झाला आहे. यातूनच तिघांनी घर, गाव सोडले तर अनेकांनी घर व शेतजमिनी विकून सावकाराचे कर्ज फेडले.
कर्जदाराची जमीन, घर किंवा किमती ऐवज तारण ठेवून मनमानी व्याजाची आकारणी केली जाते. सावकारीचा परवाना नसतानाही कायदा धाब्यावर बसवून अनेक बेकायदेशीर सावकार कर्जदारांची लूट करीत आहेत. या लुटीला ऐतवडे बुद्रुक येथील अनेकजण बळी पडले आहेत. किंबहुना तिघांनी सावकाराच्या भीतीने गावातून पलायन केले आहे.
दरमहा १० ते २० टक्क्यांपर्यंत व्याजाची वसुली केली जाते. वसुलीसाठी दमदाटी करणे, रात्री-अपरात्री घरात घुसून शिवीगाळ, मारहाण हे प्रकार नित्याचेच आहेत. छोटे व्यावसायिक, भाजी विक्रेते, कामगार, मजूर यांच्या गळ्याभोवती हा पाश घट्ट होत आहे.
कायदा काय आहे?
राज्य सरकारने २०१४ मध्ये खासगी सावकारी कायद्यात सुधारणा करून सावकारांना हा कायदा बंधनकारक केला. या कायद्यानुसार जिल्हा उपनिबंधकांकडे पाच हजार रुपये भरून खासगी सावकारीचा परवाना मिळतो. एप्रिल ते मार्च अशी वर्षभरासाठी याची मुदत असते. मार्चनंतर पुन्हा तीन महिन्यांत परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. कर्ज देण्यासाठीही सावकारांना नियमावली आहे. तारण कर्जासाठी वार्षिक १२ टक्के व्याजाची आकारणी करता येते, तर विनातारण कर्जासाठी वार्षिक १५ टक्के व्याजाची आकारणी करणे बंधनकारक आहे.
मनाई असतानाही कोऱ्या स्टॅम्पवर सह्या
मुद्दल रकमेपेक्षा व्याज जास्त घेऊ नये, कोऱ्या स्टॅम्पवर कर्जदाराच्या सह्या घेऊ नयेत, कर्ज वसुलीसाठी दमदाटी करू नये, त्याचबरोबर दर तीन महिन्याला त्याला मुद्दल आणि व्याज वसुलीची पावती द्यावी, अशी नियमावली खासगी सावकारांसाठी बंधनकारक केली आहे. प्रत्यक्षात मात्र विनापरवाना सावकारांचे जिल्ह्यात पेव फुटले आहे. वसुलीसाठी गुंडांची फौजच सावकारांकडे असते.
सावकारांची डबल गेम.!
वास्तविक व्याजाने दिलेले पैसे हे स्वतः सावकाराचे असतात. मात्र, ते दुसऱ्याचे नाव पुढे करून मध्यस्ती असल्याचे भासवत लोकांना त्रास देतात. अशा डबल गेमचा फंडा सावकार वापरत आहेत. याच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.