घरफोड्यांच्या टोळीतील तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:33 AM2021-02-25T04:33:03+5:302021-02-25T04:33:03+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. या टोळीकडून १४ गुन्हे उघडकीस ...
सांगली : महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. या टोळीकडून १४ गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून दोन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डोपल ऊर्फ डोक्या महिमान्या काळे (वय २१), चिट्या महिमान्या काळे (२५, दोघे रा. कवठेएकंद, तासगाव), पालेखान राळ्या पवार (४०, रा. सावळी, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत.
जिल्ह्यातील घरफोडी, चाेरीसह अन्य गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एलसीबीने पथक तयार केले असून ते बुधगाव परिसरात गस्तीवर होते. यावेळी संशयित बुधगाव नाक्याजवळ काही व्यक्ती स्वस्त दरात सोने व मोबाईल विक्रीसाठी थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता सोन्याची अंगठी व चेन, डोरले, मंगळसूत्र, झुबे, मोबाईल असा अडीच लाखांचा मुद्देमाल मिळून आला.
या टोळीने बोरगाव (ता. कवठेमहांकाळ), लिंब, गोटेवाडी (ता. तासगाव), कवलापूर येथून दुचाकींची चोरी, तासगाव बेंद्री रोडवर मोबाईलची चोरी, कर्नाळमध्ये मोबाईलची चोरी, हातनूर यांसह इतर ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. या टोळीकडून १४ गुन्हे उघडकीस आले असून त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.