दूध उत्पादनामध्ये तीन लाख लिटरची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 01:17 PM2020-02-04T13:17:03+5:302020-02-04T13:19:05+5:30
महापुरात पशुधनाची हानी झाल्याने जिल्ह्यात दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटले आहे. जिल्ह्यात सुमारे ४० हजार गाई, म्हैशी अशी पाळीव जनावरे असून, महापुरात जनावरांचा मृत्यू व चारा टंचाईमुळे दूध उत्पादन घटल्याची माहिती दुग्धविकास अधिकारी अरुण चौगुले यांनी दिली. दुधाच्या टंचाईमुळे दूध खरेदी दरात वाढ झाली आहे.
सदानंद औंधे
मिरज : महापुरात पशुधनाची हानी झाल्याने जिल्ह्यात दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटले आहे. जिल्ह्यात सुमारे ४० हजार गाई, म्हैशी अशी पाळीव जनावरे असून, महापुरात जनावरांचा मृत्यू व चारा टंचाईमुळे दूध उत्पादन घटल्याची माहिती दुग्धविकास अधिकारी अरुण चौगुले यांनी दिली. दुधाच्या टंचाईमुळे दूध खरेदी दरात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात नदीकाठावर असलेल्या चार तालुक्यांना आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुराचा फटका बसला. नदीकाठावरील चार तालुक्यांतच मोठ्या संख्येने दुभती जनावरे व दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. दररोज होणाऱ्या सुमारे १२ लाख लिटर दूध संकलनापैकी ४० टक्के गाईचे दूध आहे. जिल्ह्यात सरासरी १५ लाख लिटर दैनंदिन दूध संकलन होते. पावसाळ्यात दूध संकलनात वाढ होते; मात्र महापुरात पशुधनाची मोठ्याप्रमाणात हानी झाल्याने दूध उत्पादनास फटका बसला आहे. महापुरात हजारो जनावरांचा मृत्यू झाला.
नदीकाठच्या गावात पुरामुळे व पूर नसलेल्या तालुक्यात चारा टंचाई असल्याने दूध उत्पादन घटल्याचे सांगण्यात आले. दुधाच्या टंचाईमुळे दूध पावडर उत्पादन केवळ ५ टक्क्यावर आले आहे. दुधाला मागणी असल्याने गाईच्या दुधाचा खरेदीदर १८ वरुन २९ रुपये, तर म्हैशीच्या दुधाचा ३८ वरून ४४ रुपयांवर पोहोचला आहे.
मराठवाड्यातील अतिरिक्त दूध मिरजेच्या शासकीय दूध डेअरीत पावडर निर्मितीसाठी पाठविण्यात येत होते. मात्र दुधाच्या टंचाईमुळे मराठवाड्यातून येणारे दूध आता बंद झाल्याने शासकीय दूध डेअरीची खासगी संघांकडून होणारी पावडर निर्मिती बंद झाली आहे.
आॅगस्टमध्ये आलेल्या जिल्ह्यातील महापुरानंतर १० लाखांवर आलेले दूध संकलन गेल्या पाच महिन्यात १२ लाखांवर आले असून, सरासरी दूध उत्पादनात अद्याप ३ लाखांची घट आहे. पुढील सहा महिन्यात दूध उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.