खोकीधारकांना तीन महिन्यांची मुदत
By admin | Published: January 21, 2015 12:18 AM2015-01-21T00:18:00+5:302015-01-21T00:21:06+5:30
आष्ट्यातील अतिक्रमणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
सांगली : आष्टा (ता. वाळवा) येथील अतिक्रमण झालेल्या १२७ खोकीधारकांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, खोकीधारकांना प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे, असा निर्णय आज (मंगळवार) झाला.
आष्टा येथे रस्ता रुंदीकरण सुरू असून, या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खोकी हटविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. काल ही मोहीम सुरू करण्यात आली होती; मात्र आधी पुनर्वसन करण्यात यावे, नंतर खोकी हटविण्यात यावीत, अशी मागणी खोकीधारकांनी केली होती.
आज सायंकाळी विलासराव शिंदे, वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खोकीधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व खोक्यांचे पुनर्वसन करण्यासाठी वर्षभराची मुदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर खोकी काढून घेण्यासाठी महिन्याची मुदत देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. चर्चेअंती खोकी हटविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय झाला. मात्र यासाठी खोकीधारकांना शंभर रुपयांचे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे. प्रत्येकाचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र असणार आहे. या काळात खोकीधारकांनी खोके हटविले पाहिजे, असेही कुशवाह म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सुनील माने, शैलेश सावंत, सुनील भोसले, रवींद्र कण्हेरे, जयदत्त भोसले उपस्थित होते. (प्रतिनिंधी)
एसटी महामंडळाशी चर्चा करणार
खोक्यांच्या पुनर्वसनासाठी एसटी महामंडळाशी चर्चा करण्याची सूचना विलासराव शिंदे यांनी बैठकीत केली. याबाबत शिष्टमंडळानेच एसटी अधिकाऱ्यांशी चर्चा करून करार करावेत, त्यासाठी काहीही हरकत नसल्याचे कुशवाह यांनी सांगितले. खोकीधारकांनी अतिक्रमणाच्या जागेत खोकी न ठेवता कायमस्वरुपी जागा उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन केले.