वसंतदादा कारखान्यासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Published: April 22, 2016 10:49 PM2016-04-22T22:49:29+5:302016-04-23T01:03:32+5:30

पंचवार्षिक निवडणूक : ९९ अर्जांची विक्री

Three nomination papers for Vasantdada factory | वसंतदादा कारखान्यासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल

वसंतदादा कारखान्यासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल

Next

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेस शुक्रवारपासून सुरुवात झाली. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या गटातून तीन अर्ज दाखल झाले आहेत. दिवसभरात एकूण ९९ अर्जांची विक्री झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी दिली.
वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज विक्री झाली. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये मिरज उत्पादक गटातून बनेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील विजयकुमार शिवाजी जगताप, सांगली उत्पादक मतदारसंघ गटातून इनाम धामणी (ता. मिरज) येथील प्रदीप आप्पासाहेब मगदूम आणि महिला राखीव गटातून देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील अलौकिका अजयराजे घोरपडे यांचा समावेश आहे.
जगताप व घोरपडे हे उमेदवार एकमेकांच्या नावाचे अनुमोदक आहेत. २६ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छुकांनी पॅनेल निश्चितीपूर्वी अर्ज दाखल करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. कारखाना कार्यक्षेत्र चार तालुक्यांतील १६२ गावांमध्ये विखुरलेले आहे. सर्व गावांमधील कारखान्याच्या व्यक्ती उत्पादक सभासदांचा एक मतदारसंघ, याप्रमाणे पाच गट तयार केले आहेत.
या पाच गटातून प्रत्येकी तीन याप्रमाणे १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यानंतर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक व पणन संस्था मतदार संघ क्र. २ मधून १, अनुसूचित जाती, जमातीतून १, महिला २, इतर मागासवर्गीय १, भटक्या विमुक्त, विशेष मागास प्रवर्गमधून १ असे संचालक निवडून द्यायचे आहेत. वसंतदादा कारखान्याची सध्याची मतदारसंख्या ३५ हजार २३९ इतकी आहे.
सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या चार गटातील सभासदांची संख्या ३५ हजार १00, व्यक्ती सभासद ४२ आणि संस्था सभासद ९७ अशांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

सोमवारी बैठक
वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यामार्फत सत्ताधारी गटाची सोमवारी बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत निवडणुकीविषयीचे धोरण निश्चित होऊन शेवटच्या दोन दिवसात अर्ज दाखल केले जाणार आहेत.

Web Title: Three nomination papers for Vasantdada factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.