सांगली जिल्ह्यात सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम, एशियन बुकसह तीन संस्थांकडे नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 04:09 PM2018-06-21T16:09:51+5:302018-06-21T16:09:51+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बालगाव (ता. जत) येथे पार पडलेल्या योगशिबिरात एकाचवेळी १ लाख १0 हजार लोकांनी सूर्यनमस्कार घालून यापूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला.
सांगली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बालगाव (ता. जत) येथे पार पडलेल्या योगशिबिरात एकाचवेळी १ लाख १0 हजार लोकांनी सूर्यनमस्कार घालून यापूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला. सांगली जिल्हा प्रशासन व गुरुदेव आश्रमची नोंद यानिमित्ताने एशियन बुक ऑफ रेकॉर्डसह विश्वविक्रम नोंदविणाऱ्या तीन संस्थांकडे झाली आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्रही बालगाव येथे वितरीत करण्यात आले.
जिल्हा प्रशासन आणि गुरुदेव आश्रम, बालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालगाव येथे योगशिबिर भरविण्यात आले होते. शिबिरासाठी ६0 बाय ४0 चे भव्य स्टेज उभारण्यात आले होते. उपस्थितांसाठी तिनशे बाय तिनशेचे ८ ब्लॉक करण्यात आले होते. महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, नागरिक, विद्यार्थी, महिला या शिबिरात सहभागी झाल्या होत्या. सकाळी साडे नऊ वाजता सूर्यनमस्कारास सुरुवात झाली. ११ वाजता समारोप झाला. एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, मार्व्हल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा तीन संस्थांचे लोक हा विश्वविक्रम नोंदविण्यासाठी बालगाव येथे सकाळपासून दाखल झाले होते.
कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर या विविध संस्थांच्या लोकांनी उपस्थितांची गणना करण्यास सुरुवात केली. १ लाख १0 हजार लोकांनी एकाचवेळी सूर्यनमस्कार घालून नवा विक्रम प्रस्थापित केला. विश्वविक्रमी उपक्रमासाठी गेल्या दहा दिवसांपासून जिल्हा प्रशासन, बालगावचे गुरुदेव आश्रम, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, विविध शाळा, संस्थाचालक तयारी करीत होते. जिल्हा प्रशासनाने इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या लोकांसाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था याठिकाणी केल्या होत्या. त्यामुळे अत्यंत शिस्तबद्धरित्या व शांततेत हा उपक्रम पार पडला.
विश्वविक्रमाची नोंद झाल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रमही यावेळी पार पडला. शिबिरासाठी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री व पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आ. विलासराव जगताप, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, सिध्देश्वर महास्वामी, येथील आश्रमाचे प्रमुख अमृतानंद महास्वामी आदी उपस्थित होते.
कोणाच्या नावावर आहेत विक्रम
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा विचार करता २0१७ मध्ये म्हैसूर येथील जिल्हा प्रशासनाने जागतिक योगदिनानिमित्त योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला होता. त्यात ५५ हजार ५0६ लोकांच्या सहभागाने विश्वविक्रम नोंदला गेला. एशियन बुक आॅफ रेकॉर्डमधील नोंदीनुसार पुणे येथे २0१६ मध्ये १ हजार ४४0 लोकांनी एकत्रीत सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम नोंदविला होता. सांगली जिल्ह्यातील बालगावमध्ये एकूण १ लाख १0 हजार लोकांनी सहभाग नोंदवित सूर्यनमस्काराचा उपक्रम साकारला. त्यामुळे यापूर्वीचे विक्रम सांगली जिल्ह्याने मोडित काढल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन संस्थांनी याची तात्काळ नोंद घेतली असून लिमका बुकसाठीही हा विक्रम नोंदला जाण्याची चिन्हे आहेत.
नियोजनाला यश : विजयकुमार काळम-पाटील
जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील म्हणाले की, उपक्रमाचे यश हे संपूर्ण टिमचे आहे. गुरुदेव आश्रम, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, शिक्षक, विद्यार्थी, पोलिस, स्वयंसेवक अशा सहभागी सर्व लोकांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे हा विश्वविक्रम साकारला आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. केवळ विश्वविक्रमच नव्हे तर या उपक्रमातून आरोग्याविषयी जागृतीचा मोठा संदेश पोहचविण्यातही आम्हाला यश मिळाले आहे.