फिर्याद मागे घेण्यासाठी तिघांना मारहाण
By admin | Published: December 9, 2014 10:31 PM2014-12-09T22:31:51+5:302014-12-09T23:19:54+5:30
मेंढेगिरीतील घटना : लोखंडी गज व काठीचा वापर, बाराजणांविरोधात गुन्हा दाखल
जत : तालुक्यातील मेंढेगिरी येथील सौरदिव्याची बॅटरी चोरली म्हणून जत पोलिसात दिलेली फिर्याद पाठीमागे घे म्हणून चिदानंद बिरादार (वय २५), राजू बिरादार (३०), सिद्धनिगाप्पा बिरादार (५५) या तिघांना मेंढेगिरी ते जत रस्त्यावरील कमतगी ओढ्यात अडवून लोखंडी गज व काठीने आज (मंगळवार) सकाळी दहा वाजण्याच्यादरम्यान मारहाण केली. याची फिर्याद मेंढेगिरी ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश बिरादार यांनी बाराजणांविरोधात दिली आहे. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही.
संतोष शेवगुनशी व शिवगोंडा निगडी (रा. दोघे मेंढेगिरी) हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. संतोष याच्याविरोधात सौरदिव्याची बॅटरी चोरीचा, तर शिवगोंडा याच्याविरोधात वाटमारीचा गुन्हा जत पोलिसात यापूर्वी दाखल झाला आहे. याशिवाय पवनऊर्जा निर्माण कंपनीचे साहित्य चोरी केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे, असे रमेश बिरादार यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शिवगोंडा निगडी, सुभाष बिरादार, मलाप्पा बिरादार, उमेश बिरादार, मुताण्णा बिरादार, शांताबाई निगडी, मनोहर बिरादार, प्रकाश शेवगुनशी, बसवराज बिरादार, रमेश शेवगुनशी, संतोष शेवगुनशी, श्रीशैल शेवगुनशी या बाराजणांनी गावात दहशत निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी श्रीकांत बिरादार यांचा सर्पदंश होऊन मृत्यू झाला आहे, असे भासवून त्यांच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केले होते. परंतु त्यांचा मृत्यू सर्पदंशाने झाला नाही. त्यांचा खून करण्यात आला आहे. यावेळी त्यांचे शवविच्छेदन झाले नाही, असा आरोप बिरादार यांनी केला आहे. (वार्ताहर)
वाटमारीसह चोरीचे गुन्हे दाखल
संतोष शेवगुनशी व शिवगोंडा निगडी (रा. दोघे मेंढेगिरी) हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. संतोष याच्याविरोधात सौरदिव्याची बॅटरी चोरीचा, तर शिवगोंडा याच्याविरोधात वाटमारीचा गुन्हा जत पोलिसात यापूर्वी दाखल झाला आहे.
मारामारीतील एकाही आरोपीला अद्याप पोलिसांनी अटक केली नसल्याचे बिरादार यांनी सांगितले.