म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू
By अविनाश कोळी | Published: September 29, 2024 04:09 PM2024-09-29T16:09:32+5:302024-09-29T16:09:42+5:30
एक जखमी : कुटुंबीयांकडून महावितरणवर हलगर्जीपणाचा आरोप
अविनाश कोळी/सुशांत घोरपडे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंबातील तिघांचा मुत्यू झाला. दुर्घटनेत एक मुलगा जखमी असून त्याच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे.
प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय (वय ३५), पारसनाथ वनमोरे वय (४०), शाहिराज पारसनाथ वनमोरे (१२) अशी मृतांची नावे आहेत. घटनेत हेमंत वनमोरे (वय १५) हा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, म्हैसाळ येथील सुतारकीमाळ परिसरात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते. यावेळी विजेची तार तुटून शेतात पडली होती. त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मुत्यू झाला. यावेळी त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला होता. शाहीराज यालाही शॉक लागला. प्रदिप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांचाही शॉकने मुत्यू झाला, तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
महावितरण कंपनीवर संताप
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वनमोरे कुटुंबातील तिघांचा हकनाक बळी गेला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमोरे कुटुंबीयांनी केली आहे.