जबरी चोरी करणाऱ्या देवराष्ट्रेतील तिघांना अटक
By घनशाम नवाथे | Updated: January 4, 2025 21:19 IST2025-01-04T21:19:39+5:302025-01-04T21:19:51+5:30
कडेपूरच्या महिलेचाही समावेश : गुन्हे अन्वेषणकडून पाच लाखांचे दागिने हस्तगत

जबरी चोरी करणाऱ्या देवराष्ट्रेतील तिघांना अटक
घनशाम नवाथे/ लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कडेपूर येथे शेतात चाकूच्या धाकाने महिलांचे दागिने लुटणाऱ्या आणि पेठ (ता. वाळवा), कार्वे, देवनगर (ता. खानापूर) येथे जबरी चोरी व चेन स्नॅचिंग करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केली. संशयित अभिषेक जगन्नाथ जाधव (वय २३), निरंजन बळवंत कुरळे (वय २२), सौरभ महादेव इंगवले (वय २२, तिघे रा. देवराष्ट्रे, ता. कडेगाव) व सुलताना बालेखान मुलाणी (वय ४३, रा. कडेपूर, ता. कडेगाव) या चौघांना अटक करून ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लवंग मळा, कडेपूर येथे शेतात काम करणाऱ्या दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने भरदिवसा काढून नेल्याचा प्रकार दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी घडला होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांना याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक चोरट्यांचा माग काढत होते. तेव्हा पथकातील हणमंत लोहार व प्रमोद साखरपे यांना विटा ते कडेपूर रस्त्यावरून तिघे संशयित दुचाकीवरून चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचला. तिघे संशयित आल्यानंतर त्यांना थांबवून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर अभिषेकच्या खिशात सोन्याचे दागिने मिळाले. चौकशी केल्यानंतर त्याने आणि निरंजन कुरणे याने सुलताना मुलाणी हिच्या सांगण्यावरून लवंग मळा, कडेपूर येथे शेतात दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून दागिने काढून घेतल्याची कबुली दिली. तसेच कसून चौकशी केल्यानंतर अभिषेक, निरंजन आणि सौरभ या तिघांनी पेठ, कार्वे, देवनगर या ठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. कसून चौकशी केल्यानंतर तिघांकडून सोन्याचे मणी मंगळसूत्र, टॉप, दोन वाट्या असे ४ लाख ३५ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने, ७० हजारांची दुचाकी, १० हजाराचा मोबाइल असा ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांना कडेगाव, इस्लामपूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, सुनील जाधव, सूरज थोरात, सोमनाथ पतंगे, सुशांत चिले, गणेश शिंदे, सायबर ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विवेक साळुंखे यांच्या पथकाने कारवाई केली.