उद्योजकाच्या खूनप्रकरणी तिघे ताब्यात
By admin | Published: February 1, 2016 01:11 AM2016-02-01T01:11:19+5:302016-02-01T01:11:19+5:30
महिलेचा समावेश : धामणी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले; कारण गुलदस्त्यात
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील उद्योजक भास्कर होसमणी यांच्या खूनप्रकरणी साखर कारखाना परिसरातील एक हॉटेल चालक, त्याची बहीण व एका रिक्षाचालकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
होसमणी धामणी रस्त्यावर कशासाठी गेले होते, त्यांच्यासोबत आणखी कोण होते का, याचा शोध घेण्यासाठी रविवारी दिवसभर सांगली ग्रामीण पोलिसांनी धामणी रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर कुठे सीसीटीव्ही फुटेज आहेत का? याचा शोध घेतला. त्याला सायंकाळी यश आले. एका शोरुमबाहेरील फुटेज मिळाले आहे.
होसमणी यांच्या खुनाला दोन दिवसांचा कालावधी पूर्ण होत आला तरी, पोलिसांना अद्यापही त्यांच्या खुनामागचे कारण शोधता आलेले नाही. आर्थिक वादासह अनेक कारणे पुढे येत असली तरी, निश्चित कारण सापडत नसल्याने तपासाला दिशाही मिळालेली नाही. होसमणी वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील त्यांच्या कारखान्यातून रात्री पावणेनऊ वाजता बाहेर पडले होते. त्यानंतर साधारपणे ९.१० ते ९.२० या दहा मिनिटात त्यांचा खून झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले आहे. धामणी रस्त्यावर ते का आणि कशासाठी गेले होते? त्यांच्यासोबत मोटारसायकलवर आणखी कोण होते का? ही माहिती काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. कदाचित हल्लेखोरांनी त्यांना तिथे बोलावून घेतले असण्याची शक्यता आहे. होसमणी यांचे माधवनगर ते वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील त्यांचा कारखाना या दोन ठिकाणाशिवाय अन्यत्र कुठेही जाणे-येणे नव्हते. यावरुन हल्लेखोर याच परिसरातील असल्याचा संशय आहे.
होसमणी यांच्यासोबत आणखी कोण होते का? याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या पथकाने रविवारी दिवसभर धामणी रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर कुठे सीसीटीव्ही फुटेज आहे का? याची पाहणी केली. सायंकाळी त्यांना एका शोरुमबाहेर सीसीटीव्ही असल्याचे दिसून आले. त्यांनी घटनेदिवशीचे फुटेज मागवून घेतले आहे. पण होसमणी या मार्गावरुन धामणी रस्त्याकडे गेले असले तरच ते त्यात दिसणार आहेत. तरीही पोलिसांनी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. होसमणी यांनी साखर कारखान्यातील एका हॉटेल चालकासह त्याच्या बहिणीस प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले होते. या रकमेच्या वसुलीवरुन होसमणी यांचा हॉटेलचालक व त्याच्या बहिणीशी वाद झाला होता. खुनामागे हे कारण आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे. यासाठी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. (प्रतिनिधी)