तीन टक्के रुग्ण १८ वर्षांखालील, लसीकरण सुरू होणार तरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:27 AM2021-04-22T04:27:23+5:302021-04-22T04:27:23+5:30
सांगली : जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असतानाच लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सरकारने आता १८ वर्षांवरील सर्वांना १ मेपासून ...
सांगली : जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असतानाच लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सरकारने आता १८ वर्षांवरील सर्वांना १ मेपासून लसीकरण सुरू करणार असल्याचे घोषित केले आहे. जिल्ह्यात सध्या १८ वर्षांखालील बाधितांचे प्रमाण तीन टक्क्यांहून अधिक असल्याने या वयोगटासाठीही लसीकरणाची मागणी होत आहे.
कोरोनाची दुसरी लाट अधिक भयंकर रूप घेताना दिसत आहे. सध्या लसीकरणानेही गती घेतली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू आहे. तर १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक धोक्याचा वयोगट म्हणून ० ते ८ आणि ८ ते १८ या वयोगटाला समजण्यात येत आहे. त्यातही ८ ते १८ वयोगटातील मुलांना संसर्गाचा अधिक धोका असलातरी योग्य खबरदारी आणि काळजी घेतल्यास संसर्ग टाळता येणार आहे. सध्या या वयोगटात बाधित होण्याचे प्रमाण ३ टक्क्यांवर असून ते अजून कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
चौकट
१८ वर्षांखालील मुलांसाठी लसीची प्रतीक्षा
* सध्या ज्येष्ठांना लसीकरण सुरू झाले असलेतरी सर्वात तरुण वयोगट आणि त्यानंतर १८ वर्षांखालील असे दोन गट लसीकरणापासून दूर आहेत.
* कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील बाधितांचे प्रमाण ३ ते ४ टक्यांवर आहे. ते प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन केले आहे.
* सर्वच वयोगटांना लसीकरण सुरू करण्याची मागणी होत असलीतरी लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीबाबत अद्यापही संशोधन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लसी १८ वर्षांवरील सर्वांना सुरक्षित आहेत.
चौकट
१८ ते ४० वयोगटात सर्वाधिक संसर्गाचा धोका कायम आहे. गेल्यावर्षी बाधितांमध्ये ५० वर्षांवरील व्यक्तींचे प्रमाण अधिक होते. आता कोरोनाने विळख्यात घेतल्याने इतर सर्व वयोगटांपेक्षा बाधित जास्त आहेत. १ मेपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर या वयोगटाला दिलासा मिळणार आहे.
चौकट
मुलांसाठी लस येत नाही, तोपर्यंत...
* मुलांमध्ये कोरोनाविषयक कोणतीही लक्षणे आढळल्यात त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरातच त्यांना औषधे देऊ नका.
* ‘सुपर स्प्रेडर’ म्हणून सध्या मुलांना ओळखले जात असल्याने शक्यतो मुलांना घराबाहेर सोडू नये, आणि सोडले तरीही वारंवार हात धुण्यासह सॅनिटायझरचा वापर नियमित करण्याची सवय त्यांना लावावी.