शिराळा तालुक्यात तीन पूल पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 03:27 PM2019-07-09T15:27:39+5:302019-07-09T15:28:51+5:30
शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चोवीस तासात चांदोली धरण, चरण, कोकरूड या तीन मंडल विभागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मांगले-काखे,कोकरुड-रेठरे, येळापूर-समतानगर पूल वारणा नदीच्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. चांदोली धरण परिसरात १५५ मिलिमीटर, कोकरूडला ११६, तर चरण येथे ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणाची पाणीपातळी २४ तासात दीड मीटरने वाढली आहे.
शिराळा : शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चोवीस तासात चांदोली धरण, चरण, कोकरूड या तीन मंडल विभागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मांगले-काखे,कोकरुड-रेठरे, येळापूर-समतानगर पूल वारणा नदीच्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. चांदोली धरण परिसरात १५५ मिलिमीटर, कोकरूडला ११६, तर चरण येथे ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणाची पाणीपातळी २४ तासात दीड मीटरने वाढली आहे.
मांगले-काखे पूल सोमवारी सकाळी सात वाजता पाण्याखाली गेला असून पुलावर दोन फूट पाणी आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कोकरुड-रेठरे, येळापूर-समतानगर हे पूलही पाण्याखाली गेले आहेत. चांदोली धरण व अभयारण्य परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने चांदोली धरणात पाणीसाठा वेगाने वाढत आहे. धरणात ११.७७ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ३४.२० टक्के भरले आहे. उपयुक्त पाणीसाठा १.१० टीएमसीवरून ४.८७ टीएमसी झाला आहे. गतवर्षी ८ जुलैअखेर तालुक्यात सरासरी २४३.८० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र यावर्षी १०१.१० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मोरणा धरण, शिवणी, करमजाई, अंत्री, रेठरे धरणातील पाणीसाठा वाढत आहे.
तालुक्यात ४९ पाझर तलावांतील पाणीसाठा वाढत आहे. खरीप हंगामातील धूळवाफेतील भात पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटली होती, ती आता या पावसामुळे जोमाने होणार आहे. सतत चालू असलेल्या पावसामुळे भुईमूग सोयाबीन, ज्वारी पिकांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. ९० टक्के भात पेरणी झाली आहे. रोपे लागणीची कामे सुरू झाली आहेत.