Sangli : मुख्याध्यापकास मारहाण, तडसरच्या तिघांना एक वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:19 IST2025-02-07T16:19:07+5:302025-02-07T16:19:27+5:30
शाळेत वाहने लावू नका म्हटल्याचा आरोपींना राग

Sangli : मुख्याध्यापकास मारहाण, तडसरच्या तिघांना एक वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
सांगली : तडसर (ता. कडेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत बेकायदेशीर पार्किंग करू नका, असे सांगणाऱ्या मुख्याध्यापकांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघांना एक वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विटा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी हा निकाल दिला. जयपाल वसंत पवार, वैभव मुकुंद पवार, सागर मुकुंद पवार (रा. तडसर) अशी आरोपींची नावे आहेत.
तडसर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात शेजारी राहणारे आरोपी जयपाल पवार, वैभव पवार, सागर पवार हे त्यांची दुचाकी थेट शाळेच्या व्हरांड्यात, तर चारचाकी पटांगणावर बळजबरीने लावत होते. विद्यार्थ्यांना अडथळा होत होता. दि. ६ मार्च २०१९ रोजी शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या व्हरांड्यात व मैदानात वाहने लावू नयेत म्हणून ठराव घेतला होता. तसेच आरोपींना सूचना दिल्या होत्या.
दि.२७ मार्च २०१९ रोजी मुख्याध्यापक भीमराव पवार यांना कडेपूर येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाचे काम होते. सकाळी सात वाजता ते शाळेत आले. प्रार्थनेस विद्यार्थ्यांना वाहनांमुळे अडचण होईल, म्हणून मुलांमार्फत मालकांना बोलवून घेतले. वाहने बाहेर काढायला सांगून यापुढे वाहने लावू नका असे सांगितले.
त्यामुळे तिघा आरोपींना याचा राग आला. सकाळी आठच्या सुमारास मुख्याध्यापक ऑफीसमध्ये होते. तेव्हा आरोपी जयपाल, सागर, वैभव हे ऑफीसच्या बाहेर आले. मुख्याध्यापकांना बाहेर बोलवले. तेव्हा ‘तू काय शाळेचा मालक झालास काय’ म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिक्षिकांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिक गोळा झाले. तेव्हा तिघे निघून गेले. मारहाणीत मुख्याध्यापक पवार यांच्या बरगड्या मोडून, डोक्यात, छातीत व पाठीवर मुक्कामार लागला. सांगली, मिरज नंतर कराडमध्ये उपचार करण्यात आले. त्यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सरकारतर्फे या खटल्यात ॲड. रियाज जमादार यांनी आठ साक्षीदार तपासले. जोरदार युक्तिवाद केला. डॉक्टर व शिक्षिकांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार तिघा आरोपींना दोषी ठरवून शिक्षा दिली. पोलिस अधिकारी गणेश वाघमोडे यांनी तपास केला. त्यांना अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले.