शहरातील तीन दुकानदारांना ३० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:28 AM2021-05-21T04:28:08+5:302021-05-21T04:28:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लाॅकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून सकाळी ११नंतरही दुकाने सुरू ठेवल्याबद्दल तीन खतविक्री दुकानांवर कारवाई करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लाॅकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून सकाळी ११नंतरही दुकाने सुरू ठेवल्याबद्दल तीन खतविक्री दुकानांवर कारवाई करीत ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
शहरात किराणा होलसेल व्यापारी व खत दुकानदारांना लाॅकडाऊनमधून सवलत देण्यात आली आहे. सकाळी ७ ते ११ यावेळेत त्यांना दुकाने उघडण्यास परवानगी आहे. अकरानंतरही अनेक आस्थापने सुरू ठेवली जात असल्याने महापालिकेच्या पथकाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
वखार भागात वसंतलाल एम. शहा आणि कंपनीचे दुकान आणि गोदाम तसेच राजेश ट्रेडिंग कंपनी ही तीन दुकाने अकरानंतरही सुरू होती. या ठिकाणी खरेदीसाठी गर्दीही होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी खात्री करून महापालिकेच्या पथकाला या दुकानांची माहिती दिली. उपायुक्त राहुल रोकडे यांच्या आदेशाने वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, किशोर कांबळे यांनी या तीन आस्थापनांकडे धाव घेतली. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीनही दुकानांपोटी प्रत्येकी दहा हजार असा ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.