तीन बहिणींच्या गळाभेटीचा रंगला अनुपम सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 04:43 PM2020-03-13T16:43:18+5:302020-03-13T16:44:13+5:30
तीनही पालख्या एकाच मैदानात पण स्वतंत्रपणे नाचविल्या जातात. त्यानंतर खोडदेच्या दोन्ही पालख्या आबलोलीच्या ग्रामदेवतेला भेटतात. पालखी नाचविणाऱ्या प्रमुख मंडळींना अन्य ग्रामस्थ खांद्यावर घेतात.
आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली येथे आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री नवलाईदेवी यांच्या पालखी भेटीचा तिन्हीं बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आबलोली येथील श्री नवलाईदेवीच्या पालखीला खोडदे गणेशवाडी येथील श्री नवलाईदेवी व खोडदे सहाणेची वाडी येथील श्री नवलाईदेवी येऊन भेटतात. डोळ्यांचे पारणे फेडणारी गळाभेट पाहताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो.
तीनही पालख्या एकाच मैदानात पण स्वतंत्रपणे नाचविल्या जातात. त्यानंतर खोडदेच्या दोन्ही पालख्या आबलोलीच्या ग्रामदेवतेला भेटतात. पालखी नाचविणाऱ्या प्रमुख मंडळींना अन्य ग्रामस्थ खांद्यावर घेतात. खांद्यावरील भाविक व पालखी यांना नाचवत दुसऱ्या पालखीची भेट घेतात. यावेळी पालखी भेट आणि भाविकांची गळाभेट होते.
तिन्ही बहिणींची गळाभेट होताना पालखीच्या आतील नारळांची अदलाबदल होते, अशी अख्यायिका सांगण्यात येते. हा पालखीभेट सोहळा भक्तांसाठी नेत्रसुख असतो. या अनुपम गळाभेट सोहळ्याला आबलोली, खोडदे पंचक्रोशीतील जनता हजारोंच्या संख्येने उपस्थित असते.