दिल्लीसाठी आजपासून तीन विशेष एक्स्प्रेस धावणार; सांगली, मिरजेत थांबा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 05:55 PM2024-09-16T17:55:14+5:302024-09-16T17:55:32+5:30
उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना गाडी उपलब्ध
सांगली/मिरज : दक्षिण-पश्चिम रेल्वेतर्फेदिल्लीला जाण्यासाठी दि.१६, १७ व २० रोजी तीन विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहेत. या गाड्या मिरजमार्गे जाणार असल्याने उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना गाडी उपलब्ध झाली आहे. सांगलीरेल्वे स्थानकाला यातील दोन गाड्यांचा थांबा मंजूर झाला आहे.
म्हैसूर निजामुद्दीन विशेष एक्स्प्रेस गाडी (क्र. ०६५०५) दि. १६ रोजी सायंकाळी ७ वाजता म्हैसूर येथून सुटेल. दि. १७ रोजी सकाळी साडेदहा वाजता मिरजेतून व पुणे येथून सायंकाळी ४:२५ वाजता सुटेल. निजामुद्दीन येथे दि. १८ रोजी रात्री ११ वाजता पोहोचेल. बेंगलोर निजामुद्दीन एक्स्प्रेस (क्र. ०६५८५) बंगळुरू येथून दि. १७ रोजी सायंकाळी ७ वाजता सुटेल.
मिरज येथून दि. १८ रोजी सकाळी साडेदहा वाजता सुटणार आहे. सायंकाळी ४:२५ वाजता पुणे येथून सुटेल. १९ रोजी रात्री ११ वाजता निजामुद्दीन येथे पोहोचेल. हुबळी निजामुद्दीन विशेष एक्स्प्रेस (क्र. ०७३२५) दि. २० रोजी रात्री ९:४५ वाजता हुबळी येथून सुटेल. दि. २१ रोजी पहाटे ३:१५ वाजता मिरज येथून व सकाळी ८:४५ वाजता पुणे येथून सुटेल. दि. २२ रोजी सकाळी ११:३० वाजता निजामुद्दीन येथे पोहोचेल.
सांगलीला दोन गाड्यांचा थांबा
म्हैसूर-निजामुद्दीन गाडी (क्र. ०६२१५) व गाडी (क्र. ०६५८५) या दोन्ही गाड्या अनुक्रमे १७ व १८ सप्टेंबरला सकाळी ११:४५ वाजता सांगली स्थानकावर येतील. या गाड्यांची २ हजार तिकिटे उपलब्ध आहेत.
विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घ्या
सध्या दिल्लीला नियमित जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याने तत्काळ तिकिटाची वाट पहावी लागणार नाही. या विशेष रेल्वेची आरक्षित कन्फर्म तिकिटे उपलब्ध असल्याने या विशेष रेल्वेगाड्यांचा कोल्हापूर, मिरज, सांगलीतील प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार सदस्य सुकुमार पाटील यांनी केले आहे.
दिल्लीकडे जाणाऱ्या दोन विशेष रेल्वेंना सांगली स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे. सांगली शहर व परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांनी सांगलीतून पुढील प्रवासाचे बुकिंग करावे. - उमेश शहा, सांगली रेल्वे सल्लागार समिती.