कापूसखेड हल्लाप्रकरणी तीन संशयितांना अटक
By admin | Published: January 2, 2017 11:42 PM2017-01-02T23:42:19+5:302017-01-02T23:42:19+5:30
एका अल्पवयीन मुलाचा समावेश
इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथे मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सुनीता रामचंद्र चव्हाण या महिलेवर खुनीहल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. यामध्ये आणखी एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आज, मंगळवारी या सर्वांना न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे.
अमोल सदाशिव कोळी (वय २२), सुशांत रघुनाथ साळुंखे (२४, दोघे रा. दत्तनगर, कापूसखेड) व संदीप दिलीप सुपने (१८, रा. माळगल्ली, कापूसखेड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
यातील मुख्य संशयित अमोल कोळी याने शुक्रवारी दुपारी साथीदारांच्या मदतीने सुनीता चव्हाण यांच्यावर चाकूने पोटावर, पायावर, डोक्यावर, मानेवर सपासप वार केले होते.
या हल्ल्यावेळी चव्हाण यांनी प्रतिकार केला, मात्र तरीही संशयितांनी
त्यांच्यावर अमानुषपणे हल्ला चढविला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याबाबत चव्हाण यांनी वरील तिघांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक विराज जगदाळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)