सातारा जिल्ह्यातील तिघा अट्टल चोरट्यांना विट्यात अटक, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:27 PM2022-07-26T12:27:12+5:302022-07-26T12:27:54+5:30
घरफोड्या करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तीन चोरट्यांना गजाआड करण्यात विटा पोलिसांना यश
विटा : सांगली जिल्ह्यातील विटा व तासगाव आणि सातारा जिल्ह्यातील उंब्रज व औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तीन चोरट्यांना गजाआड करण्यात विटा पोलिसांना यश आले. चोरट्यांकडून पोलीसांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, जीप यासह ९ लाख ७२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
प्रतीक ऊर्फ नयन शंकर जाधव (वय २१, रा. वाघेश्वर, पो, मसूर, ता. कऱ्हाड), गौतम प्रकाश माळी (वय २१, रा. मायणी, ता. खटाव) व अनिकेत अधिकराव गायकवाड (वय २२, रा. निहीरवाडी-रहिमतपूर, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
विटा (कदमवाडा) येथील संदीप हरिभाऊ शितोळे हे राहत असलेल्या अरुणा इमारतीतील खोली नं. ४ मध्ये दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी मध्यरात्री घरफोडी करून या तिघांनी मौल्यवान वस्तूसह इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास केले होते. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना या घरफोडीतील संशयित गौतम माळी व प्रतीक ऊर्फ नयन जाधव हे चोरटे कडेगाव येथील औद्योगिक वसाहतीत भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम व निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक राजेंद्र भिंगारदेवे, अमरसिंह सूर्यवंशी, सुरेश भोसले, शशिकांत माळी, रोहित पाटील, सागर निकम, अक्षय जगदाळे, मारुती गायकवाड, उत्तम ओंबासे या पथकाने छापा टाकून त्या दोघांना अटक केली.
चौकशीत त्यांनी साथीदार अनिकेत गायकवाड याच्या मदतीने औंध, उंब्रज, विटा व तासगाव हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यासाठी वापरलेल्या जीपसह सोने-चांदीचे दागिने व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, असा सुमारे ९ लाख ७२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांनाही अटक केली.