सांगलीतील तिघा व्यापाऱ्यांनी चुकवला ८४ कोटींचा कर, पती-पत्नीसह अन्य एकाविरुद्ध चार गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 11:25 AM2023-02-01T11:25:55+5:302023-02-01T11:27:01+5:30
तिघांविरुद्ध पोलिसात चार स्वतंत्र गुन्हे दाखल
इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील तीन खाद्यतेल व्यापाऱ्यांनी एप्रिल २०११ ते मार्च २०१८ या सात वर्षांच्या कालावधीत ८४ कोटी ७८ लाख ३८ हजार रुपयांची करचुकवेगिरी केल्याचे उघडकीस आले आहे. या तिघांविरुद्ध पोलिसात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेठसारख्या छोट्या गावात कोट्यवधींची ही करचुकवेगिरी समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
सांगलीच्या वस्तू आणि सेवा कर आकारणी कार्यालयाने याबाबत पोलिसात फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार संतोष विष्णू देशमाने (रा. पेठ) यांच्याविरुद्ध दोन, तर सुनीता संतोषकुमार देशमाने (रा. पेठ) आणि महेशकुमार गजानन जाधव (रा. पाण्याच्या टाकीजवळ, पेठ) यांच्याविरुद्ध प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. या तिघांविरुद्ध महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा २०१७ च्या कलम ७४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राज्य कर निरीक्षक विनीत सर्जेराव पाटील व अमर अशोक ओमासे यांनी संतोष देशमाने यांच्याविरुद्ध फिर्यादी दिल्या आहेत. देशमाने यांनी एप्रिल २०११ ते मार्च २०१३ या कालावधीत १ कोटी ४२ लाख ३१ हजार ९९ रुपयांचा मूल्यवर्धित कर भरलेला नाही. तसेच एप्रिल २०१५ ते मार्च २०१८ या कालावधीतील ३६ कोटी ७२ लाख १४ हजार ५२४ रुपयांचा मूल्यवर्धित कर, त्यावरील व्याज आणि शास्ती भरली नसल्याने कर विभागाने पोलिसात धाव घेतली.
संदीप उत्तम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनीता देशमाने यांनी एप्रिल २०१२ ते मार्च २०१५ या कालावधीतील तेल विक्रीच्या व्यवसायातील २९ कोटी ७३ लाख ६१ हजार ५७६ रुपयांचा मूल्यवर्धित कर चुकवल्याचे म्हटले आहे. राज्य कर निरीक्षक दरीबा शंकर गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेशकुमार जाधव यांनी एप्रिल २०१२ ते मार्च २०१६ या कालावधीतील १६ कोटी ९० लाख ३० हजार ८७५ रुपयांचा कर, त्यावरील व्याज आणि शास्ती भरली नसल्याचे नमूद केले आहे.
संतोष देशमाने आणि सुनीता देशमाने या पती-पत्नीचा महालक्ष्मी ऑइल इंडस्ट्रीज व महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी या नावाने खाद्यतेलाची फेरविक्री करण्याचा व्यवसाय आहे. मूल्यवर्धित कर कायदा २०१२ नुसार त्यांच्या व्यवसायाची कर विभागाकडे नोंदणी आहे. दोघांनी खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय केल्यानंतर त्यावरील मूल्यवर्धित कर भरलेला नाही. त्यामुळे दोघांविरुद्ध ६७ कोटी ८८ लाख ७ हजार १९९ रुपयांची कर चुकवेगिरी केल्याबद्दल तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, महेशकुमार जाधव याचाही महेश व्हेज ऑइल्स या नावाने महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा २००२ अंतर्गत नोंदणी असलेला व्यवसाय आहे. त्यानेही एप्रिल १२ ते मार्च २०१६ या कालावधीत केलेल्या तेल विक्री व्यवसायासाठी देय असणारी १६ कोटी ९० लाख ३० हजार ८७५ रुपयांचा कर, त्यावरील व्याज आणि शास्ती न भरल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सांगली जिल्ह्यातील मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. कोल्हापूर विभागातील सर्व थकबाकीदार व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील थकबाकीचा भरणा ताबडतोब करावा, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. - सुनीता थोरात, राज्य कर सहआयुक्त, कोल्हापूर विभाग