तीन अनधिकृत होर्डिंग्ज हटविले; मोहीम सुरू
By admin | Published: January 7, 2016 11:49 PM2016-01-07T23:49:47+5:302016-01-08T00:25:37+5:30
तीन अनधिकृत होर्डिंग्ज हटविले; मोहीम सुरू
नाशिक : महापालिकेने २६ जानेवारीपर्यंत नाशिक शहर होर्डिंग्जमुक्त करण्याचा निर्धार केला असून, गुरुवारपासून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत ३ अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात येऊन ६७ बॅनर्स जप्त करण्यात आले.
महापालिकेने दि. २६ जानेवारीला ‘नो होर्डिंग्ज डे’ पाळण्याचे ठरविले आहे. तत्पूर्वी, शहरातील अनधिकृत होर्डिंग्जविरोधी मोहिमेला गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला. त्यानुसार पहिल्या दिवशी पूर्व विभागातील २, तर पंचवटी विभागातील १ अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आले. याशिवाय, विविध ठिकाणी लावण्यात आलेले ६७ बॅनर्सही जप्त करण्यात आले. त्यात नाशिक पश्चिम विभागातून ३५, सातपूरमधून २० तर पंचवटीतून १२ बॅनर्सचा समावेश आहे. अनधिकृतपणे होर्डिंग्ज उभारणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे. सदर मोहीम सहाही विभागात राबविली जात असून, नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांनी अनधिकृत होर्डिंग्जची माहिती महापालिकेला हेल्पलाइन अथवा तक्रार निवारण केंद्राला दूरध्वनीद्वारे कळविल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)