वृक्षसंवर्धनासाठी तीन वर्षांची सुटी खर्ची-शिक्षकाची धडपड : पांडोझरी येथील अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:24 PM2018-06-04T23:24:51+5:302018-06-04T23:24:51+5:30

Three years spent for tree plantation: Teacher tragedy: Unique initiative of Pandozhari | वृक्षसंवर्धनासाठी तीन वर्षांची सुटी खर्ची-शिक्षकाची धडपड : पांडोझरी येथील अनोखा उपक्रम

वृक्षसंवर्धनासाठी तीन वर्षांची सुटी खर्ची-शिक्षकाची धडपड : पांडोझरी येथील अनोखा उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामस्थांचेही लाभले सहकार्य

संख : दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात पिके व झाडांसाठी तर दूरच, पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण. अशा परिस्थितीत आसंगी तुर्क केंद्रातील पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेतील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघामारे (मूळ गाव बोळेगाव, ता. बिलोली, जि. नांदेड) हे सलग तीन वर्षे सुटीचा वेळ देऊन विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन शाळेतील झाडे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पूर्व भागातील पांडोझरी येथे बाबर वस्तीवर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेला येणारा कच्चा रस्ता... खडकाळ माळरानावर मराठी पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. शाळेत ४९ विद्यार्थी आहेत. शाळेच्या आवारात लिंबू, कडूनिंब, करंजी, चिंच, डोंगरी झाड, नारळ, सीताफळ, गुलमोहर, मोरपंखी, चाफा, अशोक, जास्वंद अशी वेगवेगळी ६९ झाडे लावली आहेत. सध्या उन्हाळी सुटी सुरू आहे. सुटी असतानाही शिक्षक दिलीप वाघमारे हे सलग तीन वर्षे सुटीतही विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन झाडांना दररोज सकाळी पाणी देतात. शिक्षकांसोबत चिमुकली मुलेही भर उन्हात पाणी देऊन झाडांचे संवर्धन करीत आहेत.

पांडोझरी येथील दुंडाप्पा कलादगी या टँकरमालकाने एक खेप मोफत पाणी दिले आहे. परिसरात पाणी विक्री तेजीत सुरूअसताना त्यांनी चिमुकल्या मुलांसाठी शाळेला मदत म्हणून पाण्याचा टँकर मोफत दिला आहे. शेतकरी मायाप्पा केरुबा गडदे यांनीही स्वत:ची फळबाग असतानाही महिन्यातून एकदा शेतातील कूपनलिकेचे पाणी शाळेपर्यंत पाईपलाईन करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

दिलीप वाघमारे केवळ आठ दिवस गावी जाऊन आले. वेगवेगळे उपाय वापरुन झाडे वाचविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. सुटीचा इतर वेळ शाळेसाठी देऊन दररोज सकाळी मुलांसोबत ते झाडांना पाणी देतात. विकास गडदे, अनिल गडदे, नितीन गडदे, हर्षवर्धन मोटे, अधिक मोटे, अस्मिता लोखंडे, वेदिका गडदे, राहुल गडदे, विश्वराज कोरे, शैलेश कोरे, अमीर जमखंडीकर, प्रथमेश बाबर, प्रतीक्षा बाबर, अरविंद कांबळे, काखंडकी अर्जुन, प्रदीप मोटे, अश्विनी गडदे, आरती कोरे, आदिती कोरे, श्रेया वज्रशेट्टी, रुक्मिणी काळे, क्षमा मोटे हे विद्यार्थी आळीपाळीने झाडांना पाणी देतात.

शाळा समितीचे पाठबळ
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबू मोटे व केंद्रप्रमुख रमेश राठोड, गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब जगधने, आर. डी. शिंदे, माजी जि. प. अध्यक्ष अण्णासाहेब गडदे, सरपंच जिजाबाई कांबळे, उपसरपंच नामदेव पुजारी, सलिमा मुल्ला यांची साथ आणि पालक मारुती बाबर, तुकाराम कोरे, तुकाराम बाबर, गुलाब गडदे, राजाराम गडदे, प्रकाश बाबर, आप्पासाहेब मोटे, धयाप्पा गडदे, आप्पासाहेब गडदे, माणिक बाबर, नामदेव मोटे-सावंत, गोविंद कोकरे, संतोष बजंत्री, वज्रशेट्टी निंगाप्पा, दत्तात्रय कोरे, संजय गडदे, तानाजी कोकरे, अधिक कोकरे यांचे सहकार्य आहे.
 

गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत असल्यामुळे ग्रामीण भाग उजाड होत चालला आहे. ग्रामीण भागात शेतात, घरासमोर किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे, हा उद्देश आहे. झाडांची संख्या वाढून पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.
- दिलीप वाघमारे, सहशिक्षक

Web Title: Three years spent for tree plantation: Teacher tragedy: Unique initiative of Pandozhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.