..यातूनच माणूस होतो संपन्न, सुधा मूर्तींनी सांगलीत वाचकांशी साधला दिलखुलास संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 12:03 PM2022-11-08T12:03:21+5:302022-11-08T12:04:10+5:30
सुधा मूर्ती यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी आणि टेल्कोतील पहिली महिला इंजिनीअर ते प्रख्यात लेखिका हा प्रवास उलगडला.
सांगली : आईच्या सक्त भूमिकेमुळे मला वाचन, लेखनाची आवड निर्माण झाली. लेखकाने निष्ठेने आणि सत्य लिहिले पाहिजे. जगण्याची आशा निर्माण करणारे लेखन असावे. मैत्री, वाचन, मनन, संवादातूनच माणून संपन्न होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी केले. सांगलीत त्यांनी वाचकांशी दिलखुलास संवाद साधला.
‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात अनुवादक लीना सोहनी यांनी त्यांची मुलाखत घेतली. योजना यादव यांनी निवेदन केले. साहिल मेहता यांनी स्वागत केले. सुधा मूर्ती यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी आणि टेल्कोतील पहिली महिला इंजिनीअर ते प्रख्यात लेखिका हा प्रवास उलगडला.
त्या म्हणाल्या की, आईच्या सक्त भूमिकेमुळे वाचन, लेखनाची आवड निर्माण झाली. समाजात वावरताना जे अनुभवले, पाहिले, तेच लिहिले. तुम्हीही कधीतरी अनुभवलेले असते, फक्त त्या-त्यावेळी लिहीत चला, तुम्हीही लिहू शकता. दहा पुस्तके वाचाल, तेव्हा एक परिच्छेद तुम्ही लिहू शकाल. लेखकाने निष्ठेने आणि सत्य लिहावे. लेखनात जगण्याची आशा निर्माण करण्याची शक्ती असते. आशा हेच आयुष्य आहे. कष्ट आणि कष्टातून बाहेर येण्याचे सूत्र मी मांडते. त्यामुळे वाचकांचे प्रेम मिळाले आहे.
टेल्को कंपनीत मुलगी आणि मशीन विरुद्धार्थी शब्द होते, तेथेच आज कारनिर्मितीसाठी २०० मुलींचे स्वतंत्र युनिट असल्याचे सांगतानाच, अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षण, नोकरीतील वाटेला आलेली अवहेलना, खडतर परिस्थितीतून काढलेला मार्ग या साऱ्याचे अनुभवही त्यांनी वाचकांसमोर उलघडला. मुलांना ॲडजेस्टमेंट शिकवा, त्यांच्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका, असा सल्ला पालकांना देत, आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रापंचिक गुंत्यातून मुक्त व्हाल, तर आनंदी जीवन जगाल, असे कानमंत्रही त्यांनी ज्येष्ठांना दिला.
व्हॉट्सॲपचा वापर कामापुरताच
सध्या पिढी शिक्षण खेळ, वाचन यापासून दूर चालली आहे. ती व्हॉट्सॲपमध्ये अडकत आहे, हे चुकीचे आहे. व्हॉट्सॲपचा वापर कामापुरताच करा, त्यात अडकून पडू नका, असा सल्लाही सुधा मूर्ती यांनी दिला.