उदयपूर-म्हैसूर पॅलेस क्वीन, हमसफर एक्स्प्रेस मिरजमार्गे, प्रवाशांना उत्तर-दक्षिण भारतात जाणं झालं सोपं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 02:19 PM2023-04-10T14:19:35+5:302023-04-10T14:19:54+5:30
प्रवाशांसाठी सुमारे पाचशे एसी स्लिपर सीट्स उपलब्ध
मिरज : उदयपूर-म्हैसूर पॅलेस क्वीन व श्रीगंगानगर-तिरुचिरापली नवीन साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस मिरज मार्गे सुरू झाली आहे. यामुळे सांगली मिरजेतील प्रवाशांना उत्तर व दक्षिण भारतात जाण्यासाठी नवीन एक्स्प्रेस उपलब्ध झाल्या आहेत.
उदयपूर-म्हैसूर पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेस दर मंगळवारी मिरज स्थानकामधून रात्री १०.२० वाजता सुटेल. ही एक्स्प्रेस बंगळुरूला बुधवार दुपारी १:३० वाजता पोहोचेल. ही एक्स्प्रेस बेळगाव, हुबळी, दावणगेरे, बंगलोर, मंड्या, म्हैसूर या स्थानकात थांबेल. म्हैसूर-उदयपूर पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेस प्रत्येक शुक्रवारी मिरज स्थानकातून पहाटे २:३० वाजता सुटेल. शनिवारी पहाटे २:५० वाजता उदयपूरला पोहोचेल.
ही एक्स्प्रेस पुणे, मुंबई (वसई), सुरत, वडोदरा, रतलाम, चितोडगड, उदयपूर या स्थानकात थांबेल. श्रीगंगानगर-तिरुचिरापल्ली हमसफर एक्स्प्रेस दर मंगळवारी रात्री १२:०० वाजता मिरज रेल्वे स्थानकातून रवाना होईल. या दोन्ही गाड्यांत सांगली मिरजेतील प्रवाशांसाठी सुमारे पाचशे एसी स्लिपर सीट्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत.