महिला बचत गटाच्या माध्यमातून एक जिल्हा एक वस्तूचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 03:07 PM2019-07-10T15:07:26+5:302019-07-10T15:09:07+5:30
महिला बचत गटाच्या माध्यमातून एक जिल्हा एक वस्तूचे उत्पादन करण्यात येणार असून या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
सांगली : महिला बचत गटाच्या माध्यमातून एक जिल्हा एक वस्तूचे उत्पादन करण्यात येणार असून या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'प्रज्ज्वला' योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शिराळा येथील साई संस्कृती सभागृहात महिला बचत गटातील महिलांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील, महावितरणच्या संचालिका नीता केळकर, तहसीलदार गणेश शिंदे, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, पंचायत समिती सभापती मायावती कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती रहाटकर म्हणाल्या, महिलांचे सबलीकरण झाले की संपूर्ण कुटुंबाला विकासाची दिशा मिळते. महिला बचत गटांना एक जिल्ह्यातून एक वस्तूचे उत्पादन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बँकेमार्फत मुद्रा योजनेतून एक लाख रुपये कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. डिजीटल बँकिंग प्रणालीची माहिती देण्याबरोबर बचत गटांना आपले स्वतःचे घर असावे, यासाठी ग्रामस्तरावर जागा उपलब्ध करून दिली जाईल.
हा उपक्रम योग्य पध्दतीने राबविण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. महिलांचा आर्थिकस्तर उंचावण्याबरोबर महिलांचे हक्क काय आहेत, यासाठी कायद्याविषयी मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे महिलांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, असे त्या म्हणाल्या.
यावेळी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, महिलांना सक्षम करण्यासाठी हा उपक्रम आहे. महिलांना कायदेविषयक ज्ञान, आर्थिक मदत मिळाली तर त्या कोणत्याही कामात मागे पडणार नाहीत असे ते म्हणाले. यावेळी नीता केळकर यांनी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन सुप्रिया सरदेसाई यांनी केले. शुभांगी मस्के यांनी आभार मानले. याप्रसंगी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उप सभापती सम्राटसिंह नाईक, सुखदेव पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, नगरसेविका ॲड नेहा सूर्यवंशी, राजश्री यादव, वैभवी कुलकर्णी, आर. एस. माने, बी. आर. पाटील, आर. एस. मटकरी, हेमलता टोणपे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
दरम्यान राजाराम बापू नाट्यगृह, इस्लामपूर येथेही महिला बचत गटातील महिलांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी तहसिलदार रविंद्र सबनीस, इस्लामपूर नगरपरिषद मुख्याधिकारी दीपक झिंजाड, महावितरणच्या संचालिका नीता केळकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुषमा नायकवडी, पंचायत समिती इस्लामपूर सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, म्हाडा उपाध्यक्ष विक्रम पाटील, पंचायत समिती सदस्या श्रीमती सपाटे, नगरसेविका सुप्रिया पाटील, आशा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.