टपालातलं प्रेम उरलं मोजक्या टपालप्रेमींपुरतं...
By admin | Published: October 8, 2015 11:12 PM2015-10-08T23:12:50+5:302015-10-08T23:12:50+5:30
पत्रांचा छंद : ई-मेल, एसएमएसच्या गर्दीत ‘गेले ते दिन गेले’; कोट्यवधी पत्रात उरली व्यावहारिकता--जागतिकटपाल दिन
अविनाश कोळी --- सांगली---साध्या टपालातल्या साध्या भावना हृदयाला भारी वाटायच्या. पत्रातली विचारपूस, प्रेमाचा ओलावा दीर्घकाळ टिकून राहायचा. आता ई-मेल, एसएमएस, व्हॉटस् अॅपच्या दुनियेतल्या भावना क्षणिक असल्या तरी, सध्या त्यांचीच चलती आहे. त्यामुळे टपालाचे ‘ते दिन’ आता कायमचे निघून गेले आहेत. तरीही आश्चर्याची बाब म्हणजे, सांगली जिल्ह्यात अजूनही काही टपालप्रेमींनी टपालातलं हे प्रेम पूर्वीसारखंच जपून ठेवलं आहे. सांगली जिल्ह्यातील वार्षिक पत्रप्रपंच अजूनही कोट्यवधींच्या घरात आहे. भावनेचा झरा आटताना त्याठिकाणी व्यावसायिकता आणि औपचारिकतेचे दगडगोटेच शिल्लक राहिले. अर्थात पूर्णपणे या गोष्टी संपलेल्या असाव्यात, असा समज कोणाचाही होऊ शकतो. मात्र सांगली पोस्टातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टपालातले प्रेम जिल्ह्यातील अनेक टपालप्रेमींनी आजही जिवंत ठेवले आहे. सुंदर हस्ताक्षरात हृदयापासून व्यक्त झालेल्या भावना आजही काही टपालातून दिसतात. पूर्वीपेक्षा हे प्रमाण खूपच घटल्याने, ज्या पोस्टमनच्या हाती अशी टपालं पडतात, तेही मग अशा टपालांना न्याहाळून आपुलकीने पाहतात. अशा टपालप्रेमींचे सूर ई-मेल, मोबाईल एसएमएस किंवा व्हॉटस् अॅपशी कधीही जुळले नाहीत. टपालाच्या जोडीला अनेक प्रकारच्या योजना, कार्डांनी पोस्टात गर्दी केली. साधे टपाल, स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड टपाल यांच्याबरोबरच आता वर्ल्ड नेट एक्स्प्रेस, मोबाईल मनी ट्रान्स्फर, वेस्टर्न युनियन मनी ट्रान्स्फर, ई-पोस्ट, अशा अनेक गोष्टींची रेलचेल पोस्टात सुरू आहे. आधुनिकतेचे बोट पकडून पोस्टाने ग्राहकहिताच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. परदेशात कोणतीही वस्तू तीन-चार दिवसात पाठविण्याची सोय असलेल्या वर्ल्ड नेट एक्स्प्रेसचे वार्षिक ५00 ते ६00 व्यवहार जिल्ह्यात होताहेत. मोबाईलद्वारे कोणत्याही शहरातून कुठेही अगदी काही मिनिटात पैसे पाठविण्याची सोय असलेल्या मनी मोबाईल ट्रान्स्फरच्या वापरकर्त्यांचीही संख्या वर्षाकाठी सहाशेच्या घरात आहे.
आता कार्पोरेट पोस्ट
पोस्टालाही आता कार्पोरेटचा स्पर्श झाला आहे. ई-पोस्ट कार्पोरेट नावाची यंत्रणा पोस्टात आली आहे. बँका, संस्था, साखर कारखाने, उद्योग यासह कार्पोरेट कंपन्यांच्या नोटिसा, सभांची पत्रे, केवायसीच्या सूचना या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अत्यंत माफक दरात मिळणाऱ्या या सेवेला सहकारी संस्था, साखर कारखाने यांचा प्रचंड प्रतिसाद असल्याची माहिती सहायक अधीक्षक एस. डब्ल्यू. वाळवेकर यांनी दिली. सांगलीचे प्रवर अधीक्षक डी. व्ही. गानमोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीच्या पोस्टाने जिल्ह्यात अनेक चांगल्या योजना राबविल्या आहेत.