मतदारयादीस ‘आधार’ जोडण्यास थंडा प्रतिसाद
By admin | Published: July 5, 2015 10:54 PM2015-07-05T22:54:39+5:302015-07-06T00:20:34+5:30
शिक्षकांना कामास जुंपणार : प्रशासनासोबत संघर्षाची चिन्हे
मिरज : मतदार यादीशी आधार क्रमांक लिंक करण्याच्या निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमास अल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मतदार यादीस आधार कार्ड जोडण्याच्या कार्यक्रमास शिक्षकांना जुंपण्यात येणार आहे. आधार लिंक विशेष मोहिमेंतर्गत शिक्षकांमार्फत मतदारांचे अर्ज गोळा करण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाने मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी मार्च ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधित राष्ट्रीय मतदारयाद्या शुध्दीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत मतदार यादीतील ई-पीक या क्रमांकाशी आधार कार्ड लिंक करण्यात येत आहे. यासाठी सर्व मतदार सहायता केंद्रात लिंकिंगसाठी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या उपक्रमाला अडीच महिने उलटूनही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे तीन लाख मतदार असलेल्या मिरज मतदारसंघात दोन महिन्यात केवळ ३५ हजार मतदारांनीच आधार लिंकसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३१ हजारजणांचे लिंकिंग पूर्ण झाले आहे. आधार लिंकिंगसोबतच दुबार मतदार कमी करणे व यादीत दुरुस्ती करणे, मतदाराचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी मतदार यादीत समाविष्ट करण्याचे काम करण्यात येत आहे. जास्तीत-जास्त मतदारांनी आधार लिंकिंग करावे, यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत लिंकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, नागरिकांनी मतदार ओळखपत्र लिंकिंग करण्याकडे पाठ फिरवली आहे. येत्या वर्षभरात कोणतीही निवडणूक नसल्याने राजकीय पक्षांनीही या मोहिमेकडे पाठ फिरवली आहे. संकेतस्थळावरूनही घरबसल्या आधार क्रमांक मतदान ओळखपत्राशी लिंक करता येणार आहे. याबाबत उपजिल्हा निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार गौतम साबळे यांनी तालुक्यातील ३५ हजार अर्ज आहेत. या मोहिमेबाबत जनजागृती सुरू आहे. लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांना मतदार ओळखपत्र लिंकिंग मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मतदार यादीस आधार कार्ड लिंकिंग करण्यासाठी दि. २८ रोजी बैठक घेऊन शिक्षकांना या कामाला जुंपण्यात येणार आहे. (वार्ताहर)
विरोध डावलून निर्णय
प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे आधार कार्डासह अर्ज गोळा करण्यात येणार आहेत. निवडणूक व मतदार यादीच्या कामास शिक्षक विरोध करीत असताना, आता पुन्हा मतदार यादीस आधार कार्ड जोडण्याचे काम शिक्षकांकडे सोपविण्यात येणार असल्याने यावरून संघर्षाची चिन्हे आहेत.