शिराळ्यात घड्याळाची पुन्हा ‘टिकटिक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:27 PM2018-09-26T23:27:40+5:302018-09-26T23:27:45+5:30

'Tick' again in the clock! | शिराळ्यात घड्याळाची पुन्हा ‘टिकटिक’!

शिराळ्यात घड्याळाची पुन्हा ‘टिकटिक’!

Next

अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक हेच उमेदवार असल्याचे स्पष्ट केले जात आहे, तर भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सम्राट महाडिक यांनी कोल्हापूर आणि नारायण राणे व्हाया भाजप कोअर कमिटीपर्यंत मजल मारली आहे. यामुळे भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना पुन्हा बंडखोरीचे हत्यार उपसावे लागणार का? असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला सोबत घेऊन विधानसभा लढवायची या प्रयत्नात आहेत. गत विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही शिराळ्यात मानसिंगराव नाईक यांना मिळालेली मते पाहता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्याचे नाईक समर्थकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे हाताऐवजी आगामी विधानसभा निवडणुकीत घड्याळाची टिकटिक सुरु राहणार आहे.
गत विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांना साथ द्या, कॅबिनेट मंत्रिपद देतो म्हणून सांगणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिराळा मतदार संघाकडे वळूनही पाहिले नाही.
त्यामुळे शिराळा तालुक्यात भाजपचा आलेख कमी होत गेला. तरीसुध्दा आमदार नाईक भाजपची उमेदवारी गृहित धरून विकासाला गती देत आहेत. वाळवा-शिराळ्याबरोबर सांगली-सातारा कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेत असलेल्या पेठनाक्यावरील महाडिक पॅटर्नची ताकद राजकारणात नेत्यांनी वापरून स्वत:चा फायदा केला. आता राहुल आणि सम्राट महाडिक यांनी आपला राजकीय पॅटर्न बदलला आहे. आगामी विधानसभा लढवायची तयारी दोघा बंधूंनी केली आहे.
त्यातल्या त्यात शिराळा मतदार संघ महाडिक गटाने टार्गेट केला आहे. त्यातच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सम्राट महाडिक यांना ऊर्जा दिली आहे. त्यामुळे महाडिक गट कोल्हापूर पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेऊन अगोदर भाजपची उमेदवारी नाही, तर बंडखोरी या पवित्र्यात आहे.
एकंदरीत भाजप विरोधात राष्ट्रवादी अशीच लढत होण्याचे संकेत सध्या तरी मिळत आहेत. भाजपच्या तिकिटासाठी आमदार शिवाजीराव नाईक हे उमेदवार मानले जातात. परंतु सम्राट महाडिक यांनाही भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. आघाडी कॉँग्रेसमध्ये मानसिंगराव नाईक यांना सत्यजित देशमुख यांचा अडसर आहे. यातूनही तडजोडी झाल्यास या मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
राहुल महाडिक : यांचीही तयारी..!
वाळवा तालुक्यातून व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक यांनीही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी २८ रोजी होणारा आपला वाढदिवसही मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे नियोजन केले आहे.

Web Title: 'Tick' again in the clock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.