दोन महिन्यांपासून राज्यात तिकिटांचा तुटवडा, छपाई करणाऱ्या कंपनीसोबतचा शासनाचा करार संपला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 06:53 PM2022-07-02T18:53:48+5:302022-07-02T18:54:09+5:30
विकास शहा शिराळा : संपूर्ण राज्यात प्रत्येक आर्थिक व्यवहारात अत्यावश्यक असणाऱ्या एक रुपयाच्या पावती तिकिटांचा (रेव्हेन्यू स्टॅम्प) मोठा तुटवडा ...
विकास शहा
शिराळा : संपूर्ण राज्यात प्रत्येक आर्थिक व्यवहारात अत्यावश्यक असणाऱ्या एक रुपयाच्या पावती तिकिटांचा (रेव्हेन्यू स्टॅम्प) मोठा तुटवडा आहे. तिकिटांची छपाई करणाऱ्या कंपनीसोबत महसूल विभागाचा करार ३१ डिसेंबरला संपला आहे. हा करार न झाल्याने तिकिटांची छपाई थांबली आहे. यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी येत आहेत.
आर्थिक करार, कर्ज देवघेव आणि घर भाड्याने देण्याचे करार, शासकीय कार्यालयात देण्यात येणारी विविध योजनांची रक्कम भरताना, लहान-मोठ्या व्यवहारासाठी एक रुपयाचे पावती तिकीट आवश्यक असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही तिकिटे मिळण्यात अडचणी येत आहेत. ही तिकिटे न मिळाल्याने अनेकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ज्यादा दराने काळ्या बाजारातून तिकीट घ्यावे लागते. काहीवेळा तिकीट न मिळाल्याने आर्थिक व्यवहार होत नाहीत. या तिकिटांचा कोषागार (ट्रेझरी) कार्यालयातून पुरवठा होतो, मात्र तेथेही तुटवडा आहे.
छपाई करणाऱ्या कंपनीबरोबरच्या कराराची मुदत ३१ डिसेंबररोजी संपली आहे. करार संपण्याअगोदर छपाई झालेली तिकिटे काही दिवस उपलब्ध होत होती. सहा महिन्यांत मात्र छपाई थांबल्याने गेल्या दोन महिन्यांपासून तिकिटांचा तुटवडा झाला आहे. करार संपल्यावर एप्रिल किंवा मेमध्ये तो होणे अपेक्षित होते, मात्र, हा करार झाला नाही.
शासनाच्या संबंधित कार्यालयाकडून छपाई करण्यात येणाऱ्या कंपनीबरोबरचा करार संपला आहे. नवीन करार न झाल्याने सध्या पावती तिकिटांचा तुटवडा जाणवत आहे. हा करार झाल्यावर ही तिकिटे उपलब्ध होतील. - एम. एम. कोले, सहायक अधीक्षक, विभागीय पोस्ट कार्यालय, सांगली