सांगलीत टायगर आणि डॉली श्वानांचे शुभमंगल झोकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:22 AM2020-12-26T04:22:41+5:302020-12-26T04:22:41+5:30
सांगलीत संजयनगरमध्ये टायगर आणि डॉली या श्वानजोडप्यांचा शुभमंगल सोहळा झोकात पार पडला. (छाया : सुरेंद्र दुपटे) सुरेंद्र दुपटे ...
सांगलीत संजयनगरमध्ये टायगर आणि डॉली या श्वानजोडप्यांचा शुभमंगल सोहळा झोकात पार पडला. (छाया : सुरेंद्र दुपटे)
सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : हौसेला मोल नसते, हे खरेच; पण तिची मजल श्वानांचे शुभमंगल करण्यापर्यंत असावे, हेदेखील तितकेच गमतीचे! सांगलीच्या संजयनगरमधील विलास गगणे यांनी आपल्या पाळीव श्वानांच्या जोडप्यांचे लग्न धुमधडाक्यात लावले. आपले श्वानप्रेम अशा अनोख्या रितीने व्यक्त करताना, लग्नसोहळ्यासाठीच्या शासकीय नियमांचेही काटेकोर पालन केले. या सोहळ्यासाठी परिसरातील नागरिकांनीही वऱ्हाडी मंडळी म्हणून हजेरी लावली.
गगणे यांनी ‘आली लहर केला कहर’ म्हणत श्वानांच्या विवाहाचे सारे विधीही यथासांग पार पाडले. श्वानप्रेमी गगणे कुटुंबियाकडे गेल्या अनेक वर्षांपासून विविध जातींचे श्वान आहेत. त्यातील टायगर आणि डॉली विवाहयोग्य झाले होते. कुटुंबातील सदस्य म्हणूनच त्यांची आजवर देखभाल झाली होती. विविध कार्यक्रमांतही कौटुंबिक सदस्य म्हणूनच ते सहभागी असायचे. ते वयाने विवाहयोग्य झाल्याने पालकांना, पित्यांना लग्नाची चिंता लागून राहिली होती. वधू-वर घरचेच असल्याने संशोधनाची समस्या नव्हती. त्यामुळे या जोडीसाठी गगणे यांनी लग्नाचा बेत रचला. शुक्रवारचा मुहूर्त निश्चित झाला. वधू-वर नेमस्त झाले. वर आणि वधू पितेही निश्चित झाले. लग्नासाठी नवे पोशाख शिवले. मंगलाष्टकांसह अक्षतारोपणही झाले. वरमाला आणि वधुमाला गगणे कुटुंबियांनीच घातली.
पाहुणे मंडळींसाठी गोडधोड पंगती उठल्या. कुटुंबातील सदस्याच्या लग्नात जे-जे काही केले जाते, ते सगळे श्वानांच्या लग्नातही साजरे झाले. अगदी, ‘आमच्या टायगरच्या लग्नाला यायचं हं...’ अशा पत्रिकेपासून वधूला साश्रूनयनांनी निरोप देण्यापर्यंत विधी पार पडले. चक्क मानपान, आहेर, रुखवत आणि रुसवाफुगवीही झाली. लग्नापूर्वी गुरुवारी साखरपुडाही झोकात केला होता. लग्नादिवशी सर्वांच्याच आनंदाला उधाण आले होते. सजवलेल्या कारमधून वधू-वरांची पाठवणी झाली. हिरव्या रंगाच्या साडीतील डाॅली आणि सुटातील टायगर रुबाबदार दिसत होता.
या लग्नसोहळ्यात विलास गगणे, आक्काताई गगणे, दीपांजली गगणे, महेश भोरकडे आदी सहभागी झाले.
------------------------