सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ‘वाघ’च गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2016 12:13 AM2016-06-01T00:13:21+5:302016-06-01T00:55:52+5:30

चांदोलीत २५ ठिकाणी प्राणी गणना : दुर्मिळ प्राण्यांचा समावेश; बिबट्या, गेळा, सांबर आढळले

'Tiger' missing from Sahyadri Tiger Reserve project | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ‘वाघ’च गायब

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ‘वाघ’च गायब

googlenewsNext

वारणावती : चांदोली राष्ट्रीय उद्यानातील १५ ते २२ मे दरम्यान २५ ठिकाणच्या पाणवठ्यावरील व ट्रान्झीट लाईन व मांसभक्ष्यी प्राण्यांच्या खुणा या तीन पद्धतीने आठ दिवसांची प्राणीगणना पूर्ण झाली आहे. बिबट्या, गेळा, सांबर, चौशिंगा, रानकुत्रा, रानमांजर, शेखरू यांचे अस्तित्व आढळून आले. गतवर्षी वाघांचे अस्तित्व आढळले होते. मात्र यावर्षीच्या गणनेत वाघांचे अस्तित्वच आढळून आलेले नाही. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघच नसल्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ३६७.१७ चौ.मी. आहे. पश्चिम घाटातील सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य व सांगली जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिकरित्या निर्माण झालेले जंगल निमसदाहरित व दुर्गम डोंगराळ भागातील घनदाट जंगलामध्ये विविध प्रकारची जैवविविधता निर्माण झालेली आहे. यामध्ये २८ जातींचे सस्तन प्राणी, २७५ पक्ष्यांच्या प्रजाती, ४२ जातींचे उभयचर प्राणी, १२५ जातींची फुलपाखरे, ५८ सरपटणारे प्राणी आढळून येतात. निसर्गात राहणारा प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून असतो. याच जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघांचे अस्तित्व असल्याने केंद्राने या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला ५ जानेवारी २०१० ला मान्यता दिली आहे. चांदोली अभयारण्य नैसर्गिकरित्या निर्माण झालेले असल्याने ते निर्मनुष्य आहे. त्यामुळे येथील प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे व दुर्मिळ प्राण्यांच्या व वाघांच्या अस्तित्वामुळे चांदोली अभयारण्याचा नावलौकिक वाढतच आहे.
ट्रान्झीट लाईन पद्धतीने केलेल्या प्राणी गणनेत अभयारण्याचे चांदोली-२, झोळंबी, बेती, निवळे सां., लोटीव, मळे, कोळणे, पाथरपुंज, सोनार्ली, आळोली, आंबोळे, चांदोली खुर्द, रुंदीब, निवळे को., ढोकाळे, चांदेल, सिद्धेश्वर अशा १९ भागात ट्रान्झीट लाईन पद्धतीने प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये प्रत्येक भागात एक वनपाल, एक वनरक्षक, एक वनमजूर अशा तिघांचे एक पथक अशा १९ पथकांद्वारे प्राण्यांची गणना करण्यात आली आहे.
गतवर्षीच्या गणनेत वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा आढळून आल्या होत्या. मात्र यावर्षीच्या गणनेत वाघांच्या अस्तित्वाच्या काहीच खुणा आढळून आल्या नाहीत. मात्र इतरवेळी जंगल फिरताना अभयारण्याच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्याची नोंद वेगळी केली जाते, असे अभयारण्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या सर्व गणनेचा एकत्रित आराखडा तयार करून आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाला कळविली जाते व तेथूनच आकडेवारी निश्चित केली जाते. (वार्ताहर)


प्राणी गणना : तीन टप्प्यात नियोजन
चांदोली राष्ट्रीय उद्यानातील प्राणी गणना १५ मे ते २२ मेअखेर २५ ठिकाणच्या पाणवठ्यावरील व ट्रान्झीट लाईन व मांसभक्ष्यी प्राण्यांच्या खुणा या तीन पद्धतीने आठ दिवसांत करण्यात आली. १५ ते १७ मे : ट्रान्झीट लाईन व १८ ते २० मे : मांसभक्ष्यी प्राण्यांच्या पाऊलखुणा, झाडावरील ओरखडे, पाणवठ्यातील पायवाटा व प्राण्यांची विष्ठा, तसेच विविध प्राण्यांचे आवाज यांचा शोध घेऊन त्यांची गणना करण्यात आली. २१ ते २२ मे बौद्ध पौर्णिमेला पाणवठ्यावरील लपनगृह व मचाणावर थांबून चांदण्या रात्रीची ही गणना करण्यात आली. या २५ ठिकाणच्या गणनेत जवळपास ७५ टक्के सहभागी झाले होते.

Web Title: 'Tiger' missing from Sahyadri Tiger Reserve project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.