सांगली जिल्ह्यात ८४ ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान
By शीतल पाटील | Published: November 5, 2023 05:21 PM2023-11-05T17:21:56+5:302023-11-05T17:22:51+5:30
मिरज, शिराळा, तासगाव तालुक्यात तीन वाजेपर्यंत ६० टक्के मतदान
सांगली : जिल्ह्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. दुपारी तीनवाजेपर्यंत जिल्ह्यात ५४ टक्के मतदान झाले होते. मतदानावेळी कुठेही अनुचित घटना घडलेली नाही. किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत सुरू होते. मिरज, शिराळा आणि तासगाव या तीन तालुक्यात गाव कारभारी निवडण्यासाठी मोठी चुरस दिसून आली.
जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतीपैकी १३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले. तसेच १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ८४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी २१८ तर सदस्यपदांसाठी ६६३ जागांसाठी एक हजार ५१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.रविवार सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी रंगली आहे. काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामनेही आहेत. मिरज तालुक्यातील हरीपूर, नांद्रे व जानराववाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, मळणगाव, कोकळे, दुधेभावी, ढोलेवाडी व देशिंग तसेच पलूस तालुक्यातील कुंडल आणि आमणापूर या संवेदनशील ग्रामपंचायतीत मतदानवेळी मोठी चुरस होती.
दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ५३.८४ टक्के मतदान झाले. या मिरज तालुक्यात सर्वाधिक ६२ टक्के, तासगाव तालुक्यात ६० टक्के तर शिराळा तालुक्यात ५९ टक्के मतदान झाले होते. सर्वात कमी मतदान कडेगाव तालुक्यात ४० टक्के झाले होते. उद्या सोमवारी गावकारभारी कोण याचा फैसला होणार आहे.