घाटमाथ्यावर पाणी विकत घेण्याची वेळ, बॅरेलला १०० रुपये : टँकरचा दर हजार रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:03 PM2018-12-12T23:03:25+5:302018-12-12T23:03:55+5:30
सततच्या दुष्काळामुळे चालूवर्षीही वरुणराजाने चांगलीच पाठ फिरविल्याने कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. परिसरातील कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या
जालिंदर शिंदे ।
घाटनांद्रे : सततच्या दुष्काळामुळे चालूवर्षीही वरुणराजाने चांगलीच पाठ फिरविल्याने कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. परिसरातील कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. याठिकाणी खासगी चार पाण्याचे टँकर पाणी विकण्याचे अहोरात्र काम करीत आहेत.
घाटमाथ्यावर दुष्काळात तेरावा महिना आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका बॅरेलला १०० रुपये, तर टँकरला हजार रुपये मोजावे लागत आहेत. अगोदरच चालूवर्षी पावसाविना खरीप व रब्बी पेरा वाया गेला असल्याने शेतातील उत्पन्न थांबल्याने संपूर्ण अर्थकारण बिघडले आहे. त्यातच पाणी विकत घ्यावयाचे संकट ओढवले आहे.
घाटमाथ्यावरील घाटनांद्रे गावाला गेली कित्येक वर्षे पाणीपुरवठा करणारी स्वतंत्र व्यवस्था होती. कूपनलिकेतील पाणी विहिरीत टाकून ते पाईपलाईनद्वारे टाकीत टाकून नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा होत होता. परंतु
पाण्याविना गेल्या सहा महिन्यापासून ही व्यवस्था बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या महिन्यापासून पाण्याच्या टँकरची मागणी शासनदरबारी धूळ खात पडून आहे. त्यातच सर्वच लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन तात्काळ टँकर सुरु करण्याचे आश्वासन दिले. पण हे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसत आहे. जनावरे व बागा जतन करण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. साधारण माणसाला दिवसाकाठी २० लिटर, मोठ्या जनावरांना ४० लिटर, लहान जनावरांना २० लिटर, तर शेळी-मेंढीला ५ लिटर पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्या गावात टँकर सुरु झाले, त्या गावात जनावरांच्या पाण्याचा उल्लेखच नाही.
ना छावणी, ना पाणी, त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच द्राक्षबाग जतन करण्यासाठी एक एकरासाठी २ टँकर पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे एका पाण्यासाठी दोन हजार खर्च येत आहे. त्यामुळे चांगलेच पाण्याचे संकट निर्माण झाले असून प्रशासन मात्र भेटी, बैठका व दौºयातच गुंग आहे.
गाव, वाडी, वस्तीवर सध्या पाण्यासाठी टँकरची वाट पहावी लागत आहे. गाव व परिसरात किमान चार टँकर रात्रंदिवस पाणी विकण्याचे काम करीत असून प्रशासन मात्र अभ्यास दौºयावरच अडकले आहे.
साधारणत: लागणारे पाणी व येणारा खर्च..
प्रति दिन पाणी आवश्यक पाणी सध्या खर्च
प्रति माणूस २० लिटर प्रतिदिन
मोठे जनावर ४० लिटर प्रतिदिन बॅरेल १०० लहान जनावर २० लिटर प्रतिदिन रुपयेप्रमाणे
शेळी/मेंढी ५ लिटर प्रतिदिन
एक एकर बागेसाठी २ टँकर पाणी २०००