सांगलीत रुग्णांवर रस्त्यावर मरण्याची वेळ : शरद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 02:11 PM2020-09-02T14:11:04+5:302020-09-02T14:34:19+5:30
कोरोनाच्या उद्रेकाबद्दल प्रशासनाला कल्पना असूनही त्यांनी योग्य उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सांगलीत उपचाराविना रुग्णांना रस्त्यावर मरण्याची वेळ आली आहे, अशी टीका जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
सांगली : कोरोनाच्या उद्रेकाबद्दल प्रशासनाला कल्पना असूनही त्यांनी योग्य उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सांगलीत उपचाराविना रुग्णांना रस्त्यावर मरण्याची वेळ आली आहे, अशी टीका जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, सांगली जिल्हयात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्हयाला वैद्यकीय सेवेची १२५ वर्षांची परंपरा असून सांगली-मिरज शहरांना वैद्यकीय पंढरी म्हणून जगभर ओळखले जाते. १२५ वषार्पूर्वी डॉ. विल्यम वान्लेस यांनी ज्या परिसरात वैद्यकीय सेवेचा पाया घातला आणि केवळ देशातील नव्हे तर परेदशातही अनेक दुर्धर रोगाने ग्रस्त असलेले रुग्ण मिरजेमध्ये येऊन उपचार घेऊन बरे व्हायचे. परंतु कोरोना साथीचा प्रसार रोखण्यामध्ये आणि कोरोना बाधितांवर उपचार करण्यामध्ये सांगली जिल्हयाचे काम परंपरेला साजेसे राहिले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
ते म्हणाले की, राजकीय नेतृत्वाने आणि प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य धोका ओळखून या साथीचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सुरूच ठेवली नाही, त्यामुळे आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये दोन शासकीय सर्वोपचार रुग्णालये, एक वान्लेस हॉस्पिटल अशी सर्व रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता असलेली रुग्णालये असताना, दहा बेडस, पन्नास बेडस असणाऱ्या रुग्णालय किंवा मंगल कार्यालयामध्ये उपचार सुरु करण्यात धन्यता मानली. काही खासगी रुग्णालयांनी या संधीचा फायदा घेऊन रुग्णांची प्रचंड लूट सुरु केली.
व्हेन्टीलेटरची संख्या अपुरी असल्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराविना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक रुग्ण एका हॉस्पिटलकडून दुसऱ्या हॉस्पिटलकडे प्रवेशासाठी फेऱ्या मारतच मृत्यूमुखी पडताहेत व प्रशासन मात्र ठप्प आहे. यंत्रणेत सुधारणा न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी अॅड. के. डी. शिंदे, शशिकांत गायकवाड, जनार्दन गोंधळी उपस्थित होते