कोरोनामुळे वरातीचे घोडे विकण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:24 AM2021-05-24T04:24:59+5:302021-05-24T04:24:59+5:30
वाळवा : कोरोनामुळे सध्या लग्नकार्ये थांबली आहेत. वरात, मिरवणुकांनाही बंदी आली आहे. अशातच लग्न समारंभासाठी घोड्यांची मागणीही बंदच ...
वाळवा : कोरोनामुळे सध्या लग्नकार्ये थांबली आहेत. वरात, मिरवणुकांनाही बंदी आली आहे. अशातच लग्न समारंभासाठी घोड्यांची मागणीही बंदच झाली आहे. परिणामी घोड्यांचा सांभाळ करणाऱ्या मालकांवर उपासमारीचे दिवस आले असून घोडे विकून रोजगारावर जावे लागत आहे.
वाळवा येथील विश्वास झेंडे उर्फ पिंटू घोडेवाला हे वीस वर्षांपासून ९ घोड्यांचे संगोपन करतात. त्यांचा एक घोडा दोन, अडीच लाख रुपये किमतीचा आहे. ते लग्नकार्य, यात्रा, मिरवणुकीसाठी ते घोडे भाड्याने देतात. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात व यंदा लग्नकार्य, मिरवणुका बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घोड्यांना खुराक देणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येकी दीड लाख रुपये तोटा सहन करीत सर्व घोडे विकून टाकले आहेत.
विश्वास झेंडे यांनी परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही ९ ते १० घोडी सांभाळीत होते. महाराष्ट्र व कर्नाटकात मागणीप्रमाणे लग्न कार्यक्रम, विविध मोठ्या मिरवणुका, यात्रा व इतर शुभ समारंभ यासाठी घोडे भाड्याने देत होते. एका घोड्याला हरभरा डाळ, गहू भुसा, कडबा कुट्टी व इतर तसेच ओली व वाळकी वैरण यांचा दररोज दोन ते अडीच हजार रुपये खर्च होता.
लग्न कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, मिरवणुकाच कोरोनामुळे होत नसल्याने हा खर्च कशावर भागवायचा म्हणून त्यांनी आपली दोन अडीच लाख रूपये किंमत असलेलीं घोडी लाख रुपयांना विकून टाकली आहेत. आता ते रोजगार करीत आहेत.