घाटमाथ्यावर बळीराजाला गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विकण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:33+5:302021-04-21T04:26:33+5:30
घाटनांद्रे : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात शेतकरी व व्यापाऱ्यांना सध्या गल्लोगल्ली फिरून भाजीपाला व फळेविक्री करावी लागत ...
घाटनांद्रे : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात शेतकरी व व्यापाऱ्यांना सध्या गल्लोगल्ली फिरून भाजीपाला व फळेविक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या मेहनतीने पिकवलेला माल अगदी अल्प दरात विकावा लागत आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यासह कवठेमहांकाळ तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे शासनाच्या वतीने कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उत्पादित माल, भाजीपाला व फळे स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहे. काही शेतकरी स्वत: गाडीवर फिरून भाजीपाला विक्री करत आहेत. गतवर्षी कवठेमहांकाळ तालुक्यात झालेला चांगला पाऊस तसेच जलसिंचन योजनांचे पाणी भागात आल्याने शेतकऱ्यांनीही फळपीक व भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठांमध्ये उठाव नसल्याने शेतकऱ्यांना द्राक्ष, डाळिंब, कलिंगड यांसह भाजीपाला अगदी अल्पदरात विकावा लागत आहे. खर्चापेक्षा उत्पन्न कमी मिळत आहे. व्यापारीही कोरोनाच्या नावाखाली दर पाडून मागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तडजोड करावी लागत आहे.
सध्या कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्षांचा दर १०० ते १२० रुपये प्रति पेटी, तर जास्तीत जास्त २५० रुपये प्रति पेटी आहे. अनेक लहान द्राक्ष उत्पादक शेतकरी राष्ट्रीय महामार्गावर ऐन उन्हात बसून किरकोळ द्राक्ष विक्री करत आहेत. शिवाय अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणा निर्मिती करताना दिसत आहेत. तीच परिस्थिती भाजीपाल्याची आहे. उत्पादित भाजीपाला स्थानिक व्यापाऱ्यांना अल्प दरात विकावा लागत आहे. भाजीपाल्यांचा दर पडल्याने बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे.