कोरेगावात २९ कुटुंबांवर उपासमारीची वेळ
By Admin | Published: December 5, 2014 10:17 PM2014-12-05T22:17:46+5:302014-12-05T23:20:26+5:30
कुंभार समाजावर अन्याय : ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांकडून वंशपरंपरागत जमीन हडपण्याचा प्रकार
युनूस शेख - इस्लामपूर -कोरेगाव (ता. वाळवा) येथील गायरान जमिनीतील सहा एकर क्षेत्रामधील कुंभार समाजाची वंशपरंपरागत कब्जे वहिवाट, अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली खंडित करण्याचा घाट कोरेगाव ग्रामपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांनी घातल्याचा आरोप कुंभार समाजबांधवांनी केला. समाजाच्या उपजीविकेचे साधन असलेले व्यवसाय बंद करुन २९ कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
या जागेवर १९८१ पूर्वीपासून कुंभार समाजाची वंशपरंपरागत कब्जे वहिवाट आहे. याठिकाणी वीटभट्टी, माठ बनविणे असे व्यवसाय केले जात आहेत. तहसीलदारांनी ३0 डिसेंबर १९८१ च्या पत्राने या जागेला बिनशेती परवाना दिला आहे. जागा देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून अतिक्रमणे नियमित करण्यासाठी जुलै ९८ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर नोटीस प्रसिध्द केली होती. तसेच १९८५ मध्ये ग्रामपंचायतीमधील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी कुंभार समाजास पारंपरिक व्यवसाय करण्याकरिता ना हरकत दाखलाही दिला आहे. हे क्षेत्र जलसिंचन प्रकल्पाखालील जलप्रदाय क्षेत्राखाली येत नसल्याबाबतचा ना हरकत दिला आहे, असे पत्र कोल्हापूर पाटबंधारे विभागाने तहसीलदारांना दिले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीही ही जागा कुंभार व्यवसायास आरोग्यदृष्ट्या योग्य असल्याबाबतचा दाखला दिला आहे. तसेच तालुका भूमिअभिलेखच्या निरीक्षकांनी या जागेत २९ कुटुंबांची वहिवाट असल्याचा नकाशाही तयार करुन दिला आहे.
त्यावर हा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर ही जागा पारंपरिक व्यवसायाकरिता अग्रक्रमाने जमीन मंजूर करण्याबाबत शासनाने आदेश दिले होते. त्यामुळे मार्च २००० मध्ये २५ कुटुंबांनी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे शासनाकडे ५0 हजारांची दंडनीय रक्कम जमा केली आहे. या सर्व प्रक्रियेनंतर जागा मागणी प्रस्ताव व नकाशाप्रमाणे दंडनीय रकमा भरलेल्या कुंभार समाजातील कुटुंबांची नोंद सात-बारा उताऱ्यावर होण्यासाठी मागणी केली आहे. ती गेल्या ११ वर्षांपासून महसूल विभागाकडे प्रलंबित आहे.
कोरेगाव ग्रामपंचायतीमधील विद्यमान सत्ताधाऱ्यांनी गावठाण विस्तार व विकासाच्या नावाखाली या जागेतील अतिक्रमणे हटविण्याचा डाव आखला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या खेळामुळे गावातील २९ कुटुंबातील १७१ व्यक्तींवर उपासमारीची वेळ येणार आहे.
ही जागा गावठाण असून शासनाच्या नावावर आहे. कुंभार समाजाला जागा दिल्याचा कोणताही अंतिम आदेश अद्यापपर्यंत प्राप्त नाही. मंत्रालय स्तरावर हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र या जागेतील अतिक्रमणांबाबत वरिष्ठांकडून वेळोवेळी आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी या जागेतील सर्वच समाजघटकांची अतिक्रमणे काढली जाणार आहेत.
- अमर साळुंखे, तलाठी, कोरेगाव.
जयंत पाटील यांचे दुर्लक्ष
कोरेगाव हे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील गाव. संपूर्ण कुंभार समाज त्यांच्या पाठीशी राहतो. पण १५ वर्षे मंत्री असतानाही त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष का केले, याचे कोडे उलगडत नाही. पाटील यांचे दुर्लक्ष ग्रामपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांना बळ देणारे आहे का?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.