वाळव्यात राष्ट्रवादीवर चिंतनाची वेळ
By admin | Published: February 23, 2017 10:57 PM2017-02-23T22:57:54+5:302017-02-23T22:57:54+5:30
चुरशीच्या लढती : विकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ
युनूस शेख--इस्लामपूर -वाळवा तालुक्यातील पंचायत समितीवरील सत्तेचा झेंडा कायम ठेवल्याचे समाधान असले तरी, जिल्हा परिषदेच्या २ आणि पं. स. मधील त्यांच्या ३ जागा कमी झाल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर चिंतनाची वेळ आली आहे. बागणीतील हायव्होल्टेज लढतीत राष्ट्रवादीचे बंडखोर संभाजी कचरे आणि कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्यातील लक्षवेधी लढतीत राष्ट्रवादीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला.
बागणीतील गाजलेल्या लढतीत कचरे यांनी १२० मतांनी सागर खोत यांच्यावर मात केली. कचरे यांचे १४०० पर्यंतचे गेलेले मताधिक्य शिगाव आणि बागणीच्या मतदानातून तोडत सागर खोत यांनी ते केवळ ९१ मतांवर आणून ठेवले होते. त्यामुळे मतमोजणी केंद्रात एकच खळबळ उडाली होती. टपाली मताच्या मोजणीनंतर कचरे विजयी झाले. फेरमतमोजणीतही हेच मताधिक्य कायम राहिले.
कासेगाव जि. प. गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता संभाजीराव पाटील या ६ हजार ५६७ इतक्या सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या, तर वाळव्यातून विकास आघाडीच्या सुषमा अरुण नायकवडी यांनी ४ हजार २६७ च्या मताधिक्याने विजय नोंदवला. पंचायत समितीसाठी देवराज पाटील यांनी कासेगावमधून ३ हजार २६ मतांचे अधिक्य घेतले. नेर्ले गणातील राजश्री फसाले यांनी २५९६ असे मताधिक्य घेतले. रेठरेधरणमधून शंकर चव्हाण यांनी २३२९ चे, तर येलूरमधून राहुल महाडिक यांनी २००९ मतांचे अधिक्य घेत निवडणूक जिंकली.
कामेरी पं. स. गणातून विकास आघाडीच्या सविता पाटील या अवघ्या ५१ मतांनी विजयी झाल्या. चिकुर्डे गणातून काँग्रेसच्या सुप्रिया भोसले या १०६ मतांनी, तर बावची गणातून विकास आघाडीचे आशिष काळे १५० मतांनी विजयी झाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतून विजयी उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्यावरुन ही निवडणूक अत्यंत चुरशीने झाल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीने रेठरेहरणाक्ष, कासेगाव, वाटेगाव, चिकुर्डे व बावची गटातून विजय नोंदवले, तर विकास आघाडीने पेठ, येलूर, वाळवा, कामेरी गटातून विजयाची नोंद केली. बोरगावमधून पुन्हा काँग्रेसच्या जितेंद्र पाटील यांनी तिसऱ्यांदा बाजी मारताना राष्ट्रवादीला जेरीस आणले.
या संपूर्ण निवडणुकीतून क्रॉस व्होटिंगचा वापर मतदारांनी खुबीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. चिकुर्डेमधून काट्याच्या लढतीत राष्ट्रवादीच्या संजीव पाटील यांनी शिवसेनेच्या अभिजित पाटील यांच्यावर अवघ्या ५८४ मतांनी मात केली.
या निवडणुकीत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची राष्ट्रवादीसाठी, तर कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, वैभव नायकवडी यांची विकास आघाडीकडून प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीमध्ये मतदारांनी कोणालाही एकतर्फी वर्चस्व गाजवू दिले नाही.
येलूरमधून राहुल महाडिक यांनी विजय मिळविल्यानंतर गुरुवारी त्यांच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेत गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.