आष्टा पोलिसांच्या मदतीमुळे वेळेत ऑक्सिजन पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:17+5:302021-04-28T04:29:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा पोलिसांनी भरपावसात झाडे तोडून केलेल्या तातडीच्या मदतीमुळे सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना वेळेत ऑक्सिजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा पोलिसांनी भरपावसात झाडे तोडून केलेल्या तातडीच्या मदतीमुळे सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध झाला.
आष्टा परिसरात मागील दोन दिवस सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी (दि. २६) सायंकाळी पुण्याहून सांगलीसाठी ऑक्सिजनचा टँकर येणार होता. त्याकरता आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज सुतार यांची मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांसह एस्कॉर्ट अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. ऑक्सिजन गॅसचा टँकर सायंकाळी ७ च्या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या जवळ होता. नेमका याचवेळी आष्टा परिसरात गारांसह जोरदार पाऊस सुरू झाला. आष्टा-इस्लामपूर मार्गावरील गाताडवाडी फाट्यानजीक झाडे पडल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सुतार यांना समजले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी वाहनांची गर्दी होती. रस्ता बंद होऊन वाहतूक काेंडी झाली होती. त्यामुळे मनोज सुतार यांनी एस्कॉर्ट वाहनाने वाळवा मार्गाने इस्लामपूरला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र याही ठिकाणी झाडे पडली हाेती. त्यांनी तातडीने आष्टा पोलिसांना पाचारण केले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र देशिंगे, हवालदार अशोक जाधव, सुधीर पाटील, गणेश माळी, नितीन पाटील यांच्यासह गाताडवाडीचे सरपंच राहुल कदम, पोलीसपाटील नितीन कदम यांनी भरपावसात युद्धपातळीवर काम करून मोठी झाडे कापून ट्रॅक्टरच्या साह्याने बाजूला केली. रस्त्यात थांबलेल्या वाहनांना वाट मोकळी करून दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सुतार यांनी तातडीने एस्कॉर्ट गाडी साताराकडे वळवली व सातारा हद्दीतून ऑक्सिजनचा टँकर आपल्या ताब्यात घेतला. यातील ५ टन ऑक्सिजन इस्लामपूर एमआयडीसीत दिला, तर उर्वरित १० टन ऑक्सिजन भारत इंडस्ट्रीज कार्पोरेशन माधवनगर येथे पोहोचवला. रात्री दीडच्या दरम्यान काम फत्ते झाले.
फोटो :
ओळ : आष्टा - इस्लामपूर मार्गावर गाताडवाडी फाटा येथे रस्त्यावर पडलेली झाडे पोलीस व ग्रामस्थांनी बाजूला केली.