तिळगंगेत टायर बंधारा

By admin | Published: March 31, 2017 11:05 PM2017-03-31T23:05:31+5:302017-03-31T23:05:31+5:30

राज्यातील पहिला प्रयोग : दोन महिन्यात काम पूर्ण होणार

Tire bunds in Tilgungta | तिळगंगेत टायर बंधारा

तिळगंगेत टायर बंधारा

Next



पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा नदीचे (ओढा) गतवर्षी लोकसहभागातून पुनरुज्जीवन करून पात्राची स्वच्छता करण्यात आली होती. पहिल्याच पावसात या नदीचे पात्र दुथडी भरुन वाहिले होते. परंतु सर्व पाणी वाहून गेले. त्यामुळे या पाण्याचा म्हणावा तसा वापर करता आला नाही. त्यामुळेच यावर्षी पुन्हा तिळगंगा नदीमध्ये टायर बंधारा घालण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे. याचा प्रारंभ प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.
गतवर्षी डॉ. कौस्तुभ आमटे यांच्या नेतृत्वाखाली पेठ येथील तिळगंगा ओढ्यावर कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नावाने पश्चिम महाराष्ट्रात पहिला टायर बंधारा घालण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार शिवाजीराव नाईक, इंद्रजित देशमुख, माजी जि. प. सदस्य सम्राट महाडिक, माजी पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांच्याहस्ते या उपक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
प्रारंभीच्या टप्प्यात पात्राची स्वच्छता करण्यात आली. २ कि.मी. अंतरापर्यंतच्या पात्रातील गाळ काढून स्वच्छता करण्यात आली होती. पहिल्याच पावसात हे पात्र दुथडी भरुन वाहू लागले होते. त्यामुळे टायर बंधारा घालणे शक्य झाले नाही.
सध्या पात्र कोरडे पडले असून यावर टायर बंधारा घालण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. सिमेंट काँक्रिटचा पाया भरुन घेण्यात आला आहे. त्यावर हा टायर बंधारा घालण्यात येणार आहे. पाणी साचून राहिल्याने परिसरातील पाणीप्रश्न मिटून विहिरी, कूपनलिकांनाही पाणी वाढण्यास मदत होणार आहे. दोन महिन्यात या बंधाऱ्याचे काम पूर्ण होणार आहे.
या कामाच्या पाहणीप्रसंगी मंडल अधिकारी बी. एस. वडर, तलाठी राहुल काळे, संपतराव पवार, इंजिनिअर मांगलेकर, जि. प. सदस्य जगन्नाथ माळी, राजू हिरवे, शिवाजी थोरावडे, नितीन बारोडे, विलास पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Tire bunds in Tilgungta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.