तिसंगीचा तलाठी लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:27 AM2021-05-12T04:27:44+5:302021-05-12T04:27:44+5:30
कवठेमहांकाळ : तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथील तलाठी रामू पांडुरंग कोरे (वय ४३, मूळ गाव जिरग्याळ, ता. जत) याला सहा ...
कवठेमहांकाळ : तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथील तलाठी रामू पांडुरंग कोरे (वय ४३, मूळ गाव जिरग्याळ, ता. जत) याला सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. कोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे.
तक्रारदारांच्या आजोबांनी तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावाने बक्षीसपत्र केले होते. या बक्षीसपत्राची नोंद अधिकार पत्रकात धरण्यासाठी तक्रारदार तलाठी कोरे याच्याकडे वारंवार हेलपाटे मारत होते. तरीही कोरेने तक्रारदारांचे काम केले नव्हते. अखेर कोरेने तक्रारदारांकडे या कामासाठी नऊ हजार रुपये देण्याची माणगी केली. याबाबत तक्रारदारांनी सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमवारी दिवसभर या विभागाने सापळा लावून या तक्रारीची पडताळणी केली. यावेळी चर्चेअंती तलाठी कोरे याने तक्रारदाराला सहा हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराला पैसे घेऊन कोरे याच्याकडे पाठवले. यावेळी तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारताना कोरे याला रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, संजय संकपाळ, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे यांच्या पथकाने केली.
चौकट
वर्षभरापासून रडारवर
गतवर्षी रामू कोरे याच्या आर्थिक मागणीच्या तक्रारी कवठेमहांकाळच्या तहसीलदारांकडे तिसंगीच्या ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात केल्या होत्या. त्याच्या मनमानी कारभाराबाबत चौकशीचीही मागणी केली होती. मात्र कोरोनाचा काळ असल्याने कोरेला दिलासा मिळाला होता. अखेर मंगळवारी तो लाच घेताना सापडला.