Sangli: तुम्हालाही मंत्रीपदाची ऑफर, पण..; विलासराव जगताप यांचा खासदार विशाल पाटील यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 19:12 IST2025-04-16T19:11:53+5:302025-04-16T19:12:29+5:30
भाजपविरोधात जिल्ह्यात आक्रमक भूमिकेचा इशारा

Sangli: तुम्हालाही मंत्रीपदाची ऑफर, पण..; विलासराव जगताप यांचा खासदार विशाल पाटील यांना सल्ला
जत : जिल्ह्यात जातीचे विष पेरणारी भाजप नको म्हणून मी पहिल्यांदा उठाव केला, तुम्हाला खासदार केलं, पण आता तुम्ही आम्हालाही विचारत नाही. आमदार जयंत पाटील यांची अवस्था तळ्यात मळ्यात आहे तर विश्वजित कदम भाजपाविरोधात आक्रमक नाहीत. तुम्हालाही मंत्रीपदाची ऑफर आहे. पण, स्व. वसंतदादांचा वारसा जपण्यासाठी ऑफरपेक्षा जातीपातीत रंगलेल्या भाजपविरोधात पुरोगामी विचारसरणीची मोट बांधून जिल्ह्यात तरुणांची फळी निर्माण करावी, असा सल्ला विलासराव जगताप यांनी खासदार विशाल पाटील यांना दिला.
जत विकास सोसायटीच्या नव्या वास्तूचे उद्घाटन विलासराव जगताप, खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून जगताप बोलत होते. कार्यक्रमात आमदार विलासराव जगताप यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत भाजपविरोधात तोफ डागली. जगताप म्हणाले, भाजपच्या फोडाफोडीच्या आणि जातीपातीच्या धोरणामुळे राजकीय परिस्थिती अस्थिर बनली आहे. त्याला विरोध म्हणून जिल्ह्यात पहिल्यांदा उठाव मी केला. भाजपबरोबरच पाटील व विश्वजित कदम यांना अंगावर घेऊन तुमच्या पाठीशी ठाम राहिलो. तुम्हाला खासदार केलं. पण, तुम्हीच आम्हाला विचारत नाही.
सध्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती संदिग्ध आहे. आमदार जयंत पाटील यांची अवस्था तळ्यात मळ्यात आहे. तर, विश्वजित कदम भाजपविरोधात आक्रमक नाहीत. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांना दिशा मिळत नाही. याचा फायदा भाजपला मिळत आहे. भाजपने तुम्हालाही मंत्रीपदाची ऑफर दिली आहे. तुम्ही मंत्री झालात तरी आनंद आहे. पण, जातीपातीत रंगलेल्या भाजपविरोधात पुरोगामी नेतृत्व तयार होणे काळाची गरज आहे.
विशाल पाटील यांनी आक्रमक भूमिका घ्यावी
तुम्हाला स्व. वसंतदादांचा वारसा आहे. त्यांनी पुरोगामी विचार जपत राज्याचे नेतृत्व केले. त्यांचा वारसा जपण्यासाठी तुम्ही आक्रमक भूमिका घ्यावी. त्यासाठी पुरोगामी विचारांची कास धरून तरुण फळी निर्माण करावी, असा सल्ला विलासराव जगताप यांनी खासदार विशाल पाटील यांना दिला. दोन दिवसांपूर्वी विलासराव जगताप यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची मिरजेत बैठक झाली. यात जिल्ह्यात राजकीय उलथापालथ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशावेळी खासदार विशाल पाटील यांना सल्ला देऊन भाजपविरोधात जिल्ह्यात आक्रमक भूमिका घेण्याचा इरादा जगताप यांनी स्पष्ट केला.