सांगली महापालिका मुख्यालयात तंबाखू, माव्याला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:26 AM2018-11-15T11:26:34+5:302018-11-15T11:28:34+5:30
सांगली महापालिकेच्या मुख्य इमारतीतच अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या अस्वच्छतेचा अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोरच पंचनामा केला. थोरात यांच्या पंचनाम्यानंतर प्रशासनाला जाग आली. मुख्यालयात तंबाखू, मावा व इतर तंबाखुजन्य पदार्थ घेऊन येण्यास बंदी घालणारा आदेशच उपायुक्त स्मृती पाटील यांनी दुपारी काढला.
सांगली : महापालिकेच्या मुख्य इमारतीतच अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या अस्वच्छतेचा अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोरच पंचनामा केला. थोरात यांच्या पंचनाम्यानंतर प्रशासनाला जाग आली. मुख्यालयात तंबाखू, मावा व इतर तंबाखुजन्य पदार्थ घेऊन येण्यास बंदी घालणारा आदेशच उपायुक्त स्मृती पाटील यांनी दुपारी काढला.
महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौरांसह सर्व प्रमुख कार्यालये आहेत. या कार्यालयांलगतच प्रसाधनगृह आहे. बुधवारी तिथे तीव्र दुर्गंधी पसरली होती. नगरसेवक थोरात यांनी यापूर्वीही प्रसाधनगृहातील दुर्गंधीबाबत तक्रार केली होती. पण त्याची दखल घेतली गेली नाही.
बुधवारी त्यांनी आक्रमक होत सहायक आयुक्त दिलीप घोरपडे व स्वच्छता कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून मुख्यालयातील अस्वच्छतेचा पंचानामाच केला. मुख्यालयाच्या मागील बाजूला ड्रेनेज पाईप तुटलेली होती. पाण्याच्या टाकीतून गळती सुरू होती. इमारतीतील खिडक्या पिचकाऱ्यांनी लाल झाल्या होत्या. औषध फवारणी नसल्याने डासही वाढले होते. हा प्रकार थोरात यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.
थोरात म्हणाले की महापालिका मुख्यालय प्रभाग १६ मध्ये येते. या प्रभागात स्वच्छतेसाठी तब्बल ७० कर्मचारी आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून एकही कर्मचारी मी स्वच्छतेच्या कार्यात पाहिला नाही. शहर स्वच्छतेची टिमकी प्रशासन वाजवित असताना, मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी सहायक आयुक्त घोरपडे यांनी अस्वच्छतेची कबुली देत, लवकरच स्वच्छता करण्याची ग्वाही दिली.
थोरात यांनी अस्वच्छतेचा पंचनामा केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. उपायुक्त स्मृती पाटील यांनाही याबाबत माहिती दिली गेली. त्यांनी तातडीने महापालिका मुख्यालयासह सर्वच इमारतीत तंबाखुजन्य पदार्थ आणण्यास बंदी घालण्याचा आदेश काढला. मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना प्रवेश द्यावा, ज्यांच्याकडे तंबाखुजन्य पदार्थ आढळतील, ते जप्त करावेत, प्रसंगी एक हजार रुपये दंडही करावा, असा सूचना त्यांनी दिल्या.