कामटेसह सातजणांवर आज आरोप निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:38 PM2018-09-09T23:38:46+5:302018-09-09T23:38:50+5:30
सांगली : संपूर्ण राज्यभर गाजलेल्या पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह सातजणांविरुद्ध सोमवार दि. १० सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार आहेत. सुनावणीची तारीखही ठरविली जाणार आहे. यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सांगलीत दाखल झाले आहेत.
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे (वय ४०, रा. स्फूर्ती चौक), हवालदार अनिल श्रीधर लाड (५२, रा. यशवंतनगर), नसरुद्दीन बाबालाल मुल्ला (३०), अरुण विजय टोणे (४८, रा. विश्रामबाग, पोलीस वसाहत), पोलीस वाहन चालक राहुल शिवाजी शिंगटे (४१, बालाजीनगर, कुपवाड रस्ता), झिरो पोलीस झाकीर नबीलाल पट्टेवाले (४५, रा. शंभरफुटी रस्ता) व कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे (५५, खणभाग, सांगली) या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यातील कांबळे हा जामिनावर बाहेर आहे, तर अन्य सहा संशयित न्यायालयीन कोठडीत कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आहेत.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व त्याचा मित्र अमोल भंडारे (दोघे रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) यांना ६ नोव्हेंबरला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला उलटा टांगून बेदम मारहाण केली होती. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला होता.
हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेतचा मृतदेह संशयित पोलीस हवालदार अनिल लाड याच्या मोटारीतून आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जंगलात नेला. मृतदेहासोबत कामटे, लाड, टोणे गेले होते. सोबत अमोल भंडारेलाही नेले होते. तिथे अनिकेतचा मृतदेह जाळला होता. हा धक्कादायक प्रकार उजेडात येताच राज्यभर खळबळ माजली. सांगली पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. घटनेदिवशी पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या ठाणे अंमलदारासह ११ पोलिसांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. ते अजूनही निलंबितच आहेत.
राज्य शासनाने या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्त केली होती. अॅड. निकम या खटल्यात दोन वेळा न्यायालयात हजर झाले आहेत. सोमवारी दि. १० सप्टेंबरला सुनावणी असल्याने अॅड. निकम रविवारी सांगलीत दाखल झाले. कामटेसह सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करुन सुनावणीची तारीख ठरविली जाणार आहे.
हिवरेतील तिहेरी खटल्यास प्रारंभ
हिवरे (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खून-खटल्याचे काम अॅड. निकम यांच्याकडेच आहे. या खटल्याच्या सुनावणीलाही सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यामध्ये तीन संशयित आहेत. यापूर्वी निकम यांनी सांगलीतील अमृता देशपांडे, मिरजेतील शाळकरी विद्यार्थी रितेश देवताळे खून-खटल्याचे काम पाहिले होते. या दोन्ही खटल्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती.