आज सांगलीत सर्वपक्षीय बंद, रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:53 PM2017-11-12T23:53:22+5:302017-11-12T23:55:20+5:30
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय बंदला शहरातील अनेक संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. कृती समितीच्यावतीने बंद काळात सांगली शहरातून मोटारसायकल रॅली काढण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकºयांची दौलत सभागृहात सर्वपक्षीय कृती समितीची बैठक रविवारी सकाळी पार पडली. यावेळी आंदोलनाबाबतचे नियोजन करण्यात आले. सकाळी १0 वाजता स्टेशन चौकात वसंतदादांच्या पुतळ््यास १०० व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर स्टेशन चौकातूनच सर्वपक्षीय व नागरिकांच्या सहभागाने मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती मंदिर, टिळक चौक, हरभट रोड, मारुती रोड, स्टॅँडमार्गे, सिव्हिल हॉस्पिटलमार्गे शहराच्या प्रमुख मार्गांवरून रॅली छत्रपती शिवाजी पुतळ््याजवळ येऊन सांगता करण्यात येणार आहे.
सांगली बंद आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. रिक्षा बचाव कृती समिती, स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटना, एकता व्यापारी असोसिएशन, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना, हमाल पंचायत, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, पानपट्टी असोसिएशन, कापड पेठ व्यापारी संघटना, फेरीवाले संघटना, भाजीपाला विक्रेते संघटना, सांगली जिल्हा चालक असोसिएशन, नाभिक संघटना, खाद्य-पेय विक्रेता संघटना, रेशन दुकानदार संघटना, मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशन, टिंबर मर्चंट असोसिएशन, गणेश मार्केट विक्रेते संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, मदनभाऊ युवामंच यांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय या आंदोलनात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना, मनसे, अवामी पार्टी, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टी, स्वाभिमानी विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन समाजवादी पार्टी, राष्टÑविकास सेना, भाकप, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन मुक्ती पार्टी आदी पक्ष, संघटनाही सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
दुकान सुरू ठेवणाºयांना गुलाब पुष्प
‘आज अनिकेत, उद्या आपण’ अशा आशयाचे घोषवाक्य घेऊन पुकारण्यात आलेल्या आंदोलनात गांधीगिरीचे दर्शन घडविले जाईल. जे दुकानदार दुकान सुरू ठेवतील, त्यांना समितीच्यावतीने गुलाब पुष्प देऊन त्यांच्यातील भावनाशून्यतेची जाणीव करून देण्यात येईल, असे निमंत्रकांनी सांगितले.